24.6 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeराष्ट्रीयअखेर केजरीवाल यांचा माफिनामा

अखेर केजरीवाल यांचा माफिनामा

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सुप्रीम कोर्टात ध्रुव राठी यांचा व्हीडीओ रिट्विट केल्या प्रकरणी माफी मागितली आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या वकीलांनी सुप्रीम कोर्टात कबूल केले की यूट्यूबर ध्रुव राठी यांनी भाजप आयटी सेलबाबत शेअर केलेला व्हीडीओ रिट्विट करणे ही त्यांची चूक होती. यापूर्वी, दिल्ली उच्च न्यायालयाने हाच व्हीडीओ रिट्विट केल्याबद्दल दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या प्रकरणात जारी केलेले समन्स कायम ठेवले होते. उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान केजरीवाल यांच्या वकिलांनी चूक मान्य केल्यावर कोर्टाने कनिष्ठ न्यायालयाच्या कारवाईवर तात्पुरती स्थगिती दिली.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने तक्रारदार विकास सांकृत्यायन यांना विचारले की, दिल्लीच्या मुख्यमंर्त्यांनी माफी मागितल्यास केस मागे घेणार का? सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने कनिष्ठ न्यायालयाला केजरीवाल यांच्याशी संबंधित मानहानीच्या खटल्याची सुनावणी ११ मार्चपर्यंत पुढे ढकलण्याचे निर्देश दिले. सीएम केजरीवाल यांचे प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी व्हीडीओ रिट्विट करताना अरविंद केजरीवाल यांची चूक मान्य केली.

दिल्ली उच्च न्यायालयाने ५ फेब्रुवारीच्या निर्णयात म्हटले होते की, कथित बदनामीकारक व्हीडीओ शेअर करणे हे मानहानी कायद्याचे उल्लंघन मानले जाईल. संपूर्ण माहितीशिवाय व्हीडीओ रिट्विट करणे म्हणजे काय हे समजून घ्यावे लागेल असे न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले. बदनामीकारक मजकूर रिट्विट केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते असेही यात म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR