नागपूर : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शिवतीर्थावरील गुढीपाडवा मेळाव्यात लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याची घोषणा केली. हा निर्णय मी फक्त नरेंद्र मोदी यांच्यासाठी घेत असल्याचेही राज ठाकरे यांनी सांगितले. राज ठाकरे यांच्या या भाषणानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांच्यावर आगपाखड करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज ठाकरे यांच्यावर बोच-या शब्दांत टीका केली असून अखेर वाघाची शेळी झालीच असे वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केले.
यावेळी विजय वडेट्टीवार यांनी राज ठाकरे यांच्या महायुतीला पाठिंबा देण्याच्या निर्णयावर टीकास्त्र सोडले. त्यांनी म्हटले की, राज ठाकरे दिल्ली दरबारी गेले त्याचवेळी ते भाजपसोबत जाणार, हे मराठी जनतेला कळाले होते. वाघाची शेळी झाली. पण वाघ इतक्या लवकर गवत खायला सुरुवात करेल, असे वाटले नव्हते. राज ठाकरे या लढवय्या नेत्याने गुलामगिरीचे जोखड गळ्यात का घातले?, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. राज ठाकरे महायुतीत गेल्याने महाविकास आघाडीच्या मतांवर परिणाम होणार नाही. कदाचित राज ठाकरेंची एखादी नस दाबली असेल. दाल मे कुछ तो काला है. राज ठाकरे आधी थोडेसे झुकले होते, आता कमरेतून झुकले, हे महाराष्ट्रातील जनतेला मान्य होणार नाही, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले. वडेट्टीवारांच्या या टीकेनंतर आता मनसेचे नेते काय प्रतिक्रिया देणार, हे आता पाहावे लागेल.