39.6 C
Latur
Tuesday, April 30, 2024
Homeक्रीडासनरायझर्स हैदराबादचा रोमहर्षक विजय

सनरायझर्स हैदराबादचा रोमहर्षक विजय

हैदराबाद : सनरायझर्स हैदराबादने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये तिस-या विजयाची नोंद करताना पंजाब एफसीला नमवले. नितीश रेड्डीच्या दमदार फटकेबाजीच्या जोरावर हैदराबादने मोठी धावसंख्या उभारली. अर्शदीप सिंगच्या ४ विकेट्सची कामगिरी व्यर्थ गेली. त्यानंतर पीबीकेसच्या आघाडीच्या फलंदाजांना आलेले अपयश एसआरएच च्या पथ्यावर पडले. शशांक सिंग व आशुतोष शर्मा यांनी पुन्हा एकदा नेत्रदिपक फटकेबाजी करून पंजाबसाठी शेवटपर्यंत संघर्ष केला आणि त्यांना अवघ्या २ धावांनी हार मानावी लागली.

पॅट कमिन्स व भुवनेश्वर कुमार यांनी पहिल्या दोन षटकांत अनुक्रमे जॉनी बेअरस्टो ( ०) व प्रभसिमरन सिंग ( ४) यांना माघारी पाठवले. भुवीच्या पुढच्या षटकात शिखर धवनला जीवदान मिळाले, परंतु दोन चेंडूनंतर हेनरिच क्लासेनने अप्रतिम स्टम्पिंग करून पीबीकेएसला मोठा धक्का दिला. गब्बर १४ धावांवर माघारी परतला. सॅम कुरन ( २९) चांगली फटकेबाजी करत होता, परंतु टी नटराजनने त्याला बाद केले. शशांक सिंग व सिकंदर रझा यांनी चांगला खेळ सुरू ठेवला होता. पण, जयदेव उनाडकटच्या चेंडूवर स्कूप मारण्याच्या प्रयत्नात सिकंदर ( २८) क्लासेनच्या हाती झेल देऊन परतला.

जितेश शर्माचे ( १९) अपयशाचे सत्र सुरूच राहिले आणि नितीश रेड्डीने त्याची विकेट मिळवली. २४ चेंडूंत ६७ धावांचे आव्हान पंजाबसमोर होते आणि आशुतोष शर्मा व शशांक ही मागील सामन्यातील मॅच विनर जोडी मैदानावर होती. भुवीने ४-१-३२-२ अशी स्पेल संपवली. आशुतोष व शशांक यांनी पंजाबच्या आशा जीवंत ठेवल्या होत्या आणि सामना १२ चेंडू ३९ असा जवळ आणला. टी नटराजनने १९ व्या षटकात १० धावा दिल्याने पंजाबला ६ चेंडूंत २९ धावा करायच्या होत्या.

जयदेवच्या पहिल्या चेंडूवर आशुतोषने जबरदस्त फटका मारला, परंतु सीमारेषेवर हैदराबादच्या खेळाडूने झेल टाकला व चेंडू षटकार गेला. दोन वाईडनंतर दुस-या चेंडूवर पंजाबला तसाच षटकार मिळाला. पुढच्या दोन चेंडूंवर प्रत्येकी २ धावा आल्याने २ चेंडू ११ धावा असा सामना अधिक रंगतदार झाला. पण, गोलंदाजने पुन्हा वाईड फेकला. पाचव्या चेंडूवर पुन्हा एक झेल सुटला. पंजाबला ६ बाद १८० धावा करता आल्याने हैदराबादने २ धावांनी सामना जिंकला. शशांक ४६ ( २५ चेंडू) व आशुतोष ३३ ( १५) धावांवर नाबाद राहिले.

तत्पूर्वी, एसआरएचचे स्टार फलंदाज आज पीबीकेएसच्या गोलंदाजी समोर ढेपाळले. २० वर्षीय फलंदाज नितीश कुमार रेड्डी ( चेंडूंत ४ चौकार व ५ षटकारांसह ६४ धावा ) याने अब्दुल समदसह ( २५) २० चेंडूंत ५० धावा जोडून एसआरएचला सामन्यात पुन्हा आणले. हैदराबादने ९ बाद १८३ धावांचा डोंगर उभा केला. अर्शदीप सिंगने २९ धावांत ४ विकेट्स घेतल्या. सॅम कुरन व हर्षल पटेल यांनीही प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR