28.6 C
Latur
Monday, February 24, 2025
Homeमहाराष्ट्रपूजा खेडकर यांच्या मातोश्रींवर एफआयआर

पूजा खेडकर यांच्या मातोश्रींवर एफआयआर

पुणे : महागड्या कारवर अंबर दिवा लावून फिरणा-या आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यासह आता त्यांच्या कुटुंबाचे एकेक कारनामे समोर येऊ लागले आहेत. चोर म्हणून पकडलेल्या नातेवाईकाला सोडविण्यासाठी खेडकर यांनी थेट नवी मुंबईच्या बड्या पोलीस अधिका-याला आयएएस पदाचा धाक दाखविल्याचा प्रकारही घडला आहे. अशातच काल त्यांच्या मातोश्री मनोरमा खेडकर यांचा शेतक-यांना पिस्तूल दाखवत दमदाटी करतानाचा व्हीडीओ व्हायरल झाला होता. या प्रकरणी मनोरमा यांच्यावर एफआयआर नोंदविण्यात आला आहे.

पूजा खेडकर या राज्यात प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी म्हणून तैनात होत्या. आयएएस बनून अवघे काही महिने झालेले असतानाच खेडकरांचे एकेक प्रताप समोर येऊ लागले आहेत. मुळात आयएएस पदाची नोकरी ओबीसी क्रीमीलेअर सर्टिफिकीट ते करोडोंची मालमत्ता असूनही ईडब्ल्यूएस दाखवून, डोळ्यांनी दृष्टीहीन असल्याचे दाखवून बळकावल्याचा आरोप होत आहे. आता यामुळे यूपीएससी अ‍ॅक्शनमध्ये आली असून त्यांची ही सर्टिफिकीट तपासली जाणार आहेत. काही काळेबेरे आढळल्यात खेडकर यांना तत्काळ सेवेतून बडतर्फ केले जाणार आहे.

या खेडकर यांच्या मातोश्री मनोरमा यांनी दोन दिवसांपूर्वी पुणे वाहतूक पोलिसांना व माध्यमांना दमदाटी केली होती. पोलिस खेडकर वापरत असलेल्या ऑडी कारवरील चलनांची नोटीस देण्यासाठी गेले होते. परंतू मनोरमा यांनी गेट उघडण्यास मज्जाव करत त्यांनाच दमदाटी केली. आता पोलिस अ‍ॅक्शनमध्ये आले आहेत. मनोरमा खेडकर, दिलीप खेडकर आणि इतरांविरोधात विरोधात कलम ३२३, ५०४, ५०६, १४३, १४४, १४७, १४८ आणि १४९ तसेच शस्त्रास्त्र कायद्यानुसार एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

हे प्रकरण शेतक-यांची जमीन हडपण्याशी संबंधीत आहे. २०२३ मधील मनोरमा यांचा व्हीडीओ व्हायरल झाला आहे. या शेतक-यांनी याविरोधात पौड पोलिस ठाण्यात तक्रारही देण्याचा प्रयत्न केला होता. परंतू, वरून फोन आल्याने पोलिसांनी ही तक्रार नोंदविली नाही, असा आरोप या शेतक-यांनी केला आहे. आता प्रकरण पेटत असल्याचे पाहून पुणे पोलिसांनी मनोरमा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR