बार्शी : प्रतिनिधी
तालुक्यातील वैराग येथील शेतक-यांचे गतवैभव म्हणून ओळख असलेल्या संतनाथ सहकारी साखर कारखान्याला गुरुवार, दि. ६ मार्च रोजी दुपारी लागलेल्या आगीत कारखाना परिसरातील साहित्याचे नुकसान झाले. ही आग इतकी भीषण होती की, अर्धा ते पाऊण तास प्रयत्न केल्यानंतर ही आग आटोक्यात आली. या आगीत कारखान्याच्या स्टोअर रूममधील साहित्य आगीत खाक झाले.
याबाबत कारखाना प्रशासनाकडून वैराग पोलिस ठाण्यात कोणतीही फिर्याद रात्री साडेआठ वाजेपर्यंत दाखल झालेली नव्हती. त्यामुळे आगीत नेमके किती रुपयांचे नुकसान झाले, याचा आकडा कळू शकलेला नाही. धुराचे लोट दिसताच अग्निशमन विभागाच्या कर्मचा-यांसह वैराग शहर परिसरातील तरुण, नागरिकांनी कारखाना परिसरात धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. यावेळी अग्निशमन विभागाच्या गाडीने पाणी टाकून आग आटोक्यात आणली.
बार्शी तालुक्यात सलग दोन ठिकाणी आगीच्या घटना घडल्या असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकेकाळी वैरागची ओळख ही संतनाथ सहकारी साखर कारखान्याने मिळवून दिली होती. मात्र गत काही वर्षांपासून हा साखर कारखाना बंद असल्याने जीवीत हानी टळली. कारखाना परिसरात मोठी लोकवस्ती असल्याने या परिसरात पुन्हा अशी घटना घडू नये, यासाठी वैराग नगरपंचायतने उपयोजना करावी, अशी मागणी जोर धरत आहे.