जेरुसलेम : इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धविराम आणखी एका दिवसासाठी वाढवण्यात आल्यानंतर इस्रायल-नियंत्रित जेरुसलेममध्ये झालेल्या गोळीबारात तीन जण ठार आणि अनेक जण जखमी झाले आहेत. बसस्थानकावर गुरुवारी सकाळी गर्दीच्या वेळी हा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये २४ वर्षीय महिला आणि ७० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. युद्धबंदी असूनही जेरुसलेममध्ये गोळीबार करण्यात आला आहे.
ज्या दोन हल्लेखोरांनी हा हल्ला केला, ते सख्खे भाऊ होते, त्यांचाही मृत्यू झाला आहे. इस्रायली सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पूर्व जेरुसलेममध्ये राहणारे हे हल्लेखोर हमासचे समर्थक होते. इस्रायली अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, त्यांनी ‘दहशतवादी कारवायांसाठी’ तुरुंगवासाची शिक्षाही भोगली होती.
तसेच इस्त्रायल आणि हमासने दोन्ही बाजूंमध्ये सुरू असलेला युद्धविराम आणखी एक दिवस वाढवण्यात आल्याची माहिती दिली आहे. इस्रायली लष्कराने सांगितले की, ओलिसांची सुटका करण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्यासाठी मध्यस्थांच्या प्रयत्नांमुळे हमाससोबत युद्धविराम कायम राहील. त्याचबरोबर इस्रायलसोबतचा युद्धविराम एका दिवसासाठी वाढवण्यात येत असून तो आता सातव्या दिवशीही लागू होईल, असे हमासने म्हटले आहे. वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.
ओलिसांच्या संदर्भात हमास आणि इस्रायलमध्ये झालेला करार गेल्या शुक्रवारपासून लागू आहे. ज्या अंतर्गत हमास काही इस्रायली ओलीसांची सुटका करत आहे आणि त्या बदल्यात इस्रायल काही पॅलेस्टिनी कैद्यांना आपल्या तुरुंगातून सोडत आहे. या काळात युद्धविराम लागू आहे. तसेच, मदत आणि अत्यावश्यक औषधांनी भरलेले ट्रक गाझामध्ये दाखल होत आहेत. या युद्धबंदीचा गुरुवारी सहावा दिवस आहे.