32.5 C
Latur
Sunday, May 26, 2024
Homeमनोरंजनसलमानच्या घराबाहेर गोळीबार, सुरक्षेत केली वाढ

सलमानच्या घराबाहेर गोळीबार, सुरक्षेत केली वाढ

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंट या घराबाहेर गोळीबार करण्यात आला आहे. यामुळे मायानगरीत एकच खळबळ उडाली असून, बॉलिवूडमध्ये भीती पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे ४.५० च्या सुमारास दुचाकीस्वार दोन शूटर्सनी हवेत चार राऊंड गोळीबार केल्याचे सांगण्यात येत आहे.

गोळीबार केल्यानंतर दोन्ही शूटर्सनी तेथून पळ काढला. यानंतर पोलिसांनी सलमान खानच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली आहे.

या गोळीबाराच्या घटनेनंतर मुंबई गुन्हे शाखेसह वांद्रे पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असून, फॉरेन्सिक टीमलाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. यासोबतच गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात आलेले सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन पोलिस तपास करत आहेत. सलमानला तुरुंगात असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईकडून अनेक वेळा जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत.

लॉरेन्स बिश्नोईने दिली होती सलमानला धमकी
दरम्यान, २०२३ मध्ये तुरुंगात असलेल्या लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून सलमानच्या ऑफिसला धमकीचा ईमेल पाठवण्यात आला होता. लॉरेन्स बिश्नोईच्या धमकीनंतर मुंबई पोलिसांनी सलमान खानची सुरक्षा वाढवली होती. आताही सलमान खानला वाय प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. मोहित गर्गच्या आयडीवरून हा ईमेल सलमान खानच्या ऑफिसला पाठवण्यात आला होता.

महाराष्ट्राची कायदा-सुव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त -संजय राऊत
सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेने देशभरात खळबळ उडाली असून, या घटनेनंतर उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली उडवत त्यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. मुंबईसह महाराष्ट्राची कायदा-सुव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून, सरकार महायुतीच्या चिल्लर नेत्यांना सुरक्षा पुरवण्यात व्यस्त असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR