21.3 C
Latur
Thursday, December 26, 2024
Homeराष्ट्रीयआधी ममता, मग नितीश... आता पुढचा नंबर आपचा?

आधी ममता, मग नितीश… आता पुढचा नंबर आपचा?

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुका जवळ आल्या असून इंडिया आघाडीत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आधी राज्यातील सर्व जागांवर एकट्याने निवडणूक लढवण्याची घोषणा केली, त्यानंतर भारतीय जनता पक्षाने (भाजपा) नितीश कुमार यांना आपल्या बाजूने करून विरोधकांना मोठा धक्का दिला. काही महिन्यांतच एकापाठोपाठ एक दोन मोठे धक्के बसले असून आता आम आदमी पक्षाच्या भवितव्याबाबत चर्चेला उधाण आले आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी अलीकडेच दावा केला होता की, आम आदमी पक्ष राज्यातील सर्व १३ लोकसभेच्या जागा जिंकेल. पंजाब आणि दिल्लीत जागावाटपाबाबत आम आदमी पक्ष आणि काँग्रेसमध्ये चर्चा सुरू असून या दोन राज्यांमध्ये सत्तेत असलेल्या पक्षाने हरियाणामध्येही तीन जागांची मागणी केली आहे. हरियाणात आम आदमी पक्ष सक्रिय झाला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हरियाणातील जींद येथे एका जाहीर सभेला संबोधित केले. अरविंद केजरीवाल यांनी इंडिया आघाडीसोबत लोकसभा निवडणूक लढवू आणि त्याचवेळी विधानसभा निवडणूक एकट्याने लढवण्याची घोषणाही केली.

लोकसभेच्या निवडणुका एप्रिल-मेमध्ये, तर विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये होणार आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्ष सक्रिय झाला असून तयारी केली जात आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले की, आज लोकांचा फक्त एकाच पक्षावर विश्वास आहे, तो म्हणजे आम आदमी पक्ष. त्यांनी दिल्ली आणि पंजाब सरकारच्या कामाचा उल्लेख केला आणि दोन्ही राज्यांमध्ये जनता आनंदी असल्याचे सांगितले. आज हरियाणात मोठ्या बदलांची गरज आहे. केजरीवाल यांनी काँग्रेसचे नाव न घेता हल्लाबोल करताना म्हटले की, राज्यातील जनता मागील सरकारांमुळे निराश झाली आहे. जनतेने प्रत्येक पक्षाला संधी दिली पण प्रत्येकाने आपली तिजोरी भरली.

इंडिया आघाडीच्या बॅनरखाली लढणार
दिल्ली आणि पंजाबमध्ये २४ तास वीज पुरवठा केला जातो. काँग्रेस, भाजपा, जेजेपी हे करू शकतात का? असा सवाल त्यांनी जनतेला केला. ते तसे करू शकत नाहीत. हे फक्त आम आदमी पक्षच करू शकते असेही म्हटले. केजरीवाल यांनी राज्यातील सर्व ९० विधानसभा जागांवर एकट्याने निवडणूक लढवण्याची घोषणा केली आणि आम्ही लोकसभा निवडणूक इंडिया आघाडीच्या बॅनरखाली लढणार असल्याचेही सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR