दिसपूर : आसाममध्ये मुसळधार पावसामुळे पुराने कहर केला आहे. यामुळे राज्यात मृत्यूमुखी पडणा-यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (एएसडीएमए) च्या म्हणण्यानुसार, आसाममधील पुरात आतापर्यंत ९३ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर करीमगंज जिल्ह्यात गेल्या २४ तासांत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुराच्या अहवालानुसार, रविवारी करीमगंज जिल्ह्यात एका मुलासह दोन लोकांचा मृत्यू झाला. यानंतर मृतांचा आकडा ९३ वर पोहोचला आहे.
दरम्यान, राज्यातील काही भागात पुराचे पाणी कमी झाले आहे. मात्र १८ जिल्ह्यांमध्ये अजूनही जनजिवन विस्कळीत झालेले आहे. कचार, नलबारी, कामरूप, गोलाघाट, मोरीगाव, चिरांग, दिब्रुगढ, धुबरी, गोलपारा, नागाव आणि करीमगंज जिल्ह्यांमध्ये सुमारे ५.९८ लाख लोक पुरामुळे प्रभावित झाले आहेत. तर १३४२ गावे अजूनही पाण्यातच असून जवळपास १३ जिल्ह्यातील ५८ हजार लोक मदत छावण्यांमध्ये राहत आहेत.