इस्लामाबाद : पाकव्याप्त काश्मीर (पीओके)चे माजी पंतप्रधान सरदार तन्वीर इलियास खान यांना आज कौटुंबिक मालमत्तेच्या वादात अटक करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अटकेनंतर त्यांना मरगल्ला पोलिस ठाण्यात हलवण्यात आले आहे. कौटुंबिक संपत्ती बळकावणे आणि गोळीबाराच्या घटनेत सहभागी असल्याच्या आरोपाखाली इलियास खान यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
इलियास यांच्या अटकेनंतर त्यांच्या वकीलसह त्यांच्या समर्थकांनी पोलिस स्टेशनबाहेर निदर्शने सुरू केली आहेत, तर पक्षाचे कार्यकर्ते त्याच्या निवासस्थानाबाहेर मोठ्या संख्येने जमले आहेत. १ मे रोजी इलियासविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सेंटॉरस मॉलची केंद्रीय कार्यालये आणि महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. सेंटॉरस मॉलचे उप सुरक्षा प्रभारी कर्नल (निवृत्त) टिपू सुलतान यांनी इलियासविरुद्ध एफआयआर दाखल केला होता.