शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील उमरदरा येथील माजी सरपंच तथा सध्या उपसरपंच असलेले शिवसेनेचे तालुका उपप्रमुख व्यंकटराव नरसिंग ढोपरे वय ५२ वर्षे हे सध्या पुणे येथे व्यवसाया निमित्त गेल्या दोन वर्षा पासून वास्तव्यास होते. सध्या मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून प्रत्येक गावात, नगरात , मनोज जरांगे पाटील यांना पाठींबा देण्यासाठी साखळी उपोषण सुरु आहेत. याच मागणीसाठी व्यंकटराव ढोपरे यांनी आळंदी येथील इंद्रायणी नदीत त्यांना पोहता येत असल्यामुळे स्वत:चे हात पाय बांधून घेऊन दि.२७ आक्टोंबर रोजी दुपारी ३ ते ४ च्या दरम्यान उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
दुपारीे ३ पर्यंत ते आपल्या कुटूंबा सोबत संपर्कात होते. पण नंतर संपर्क होत नसल्यामुळे मोबाईल च्या लोकेशन वर त्यांचा शोध घेतला असता इंद्रायणी नदी काठी एक मोबाईल एक ज्ञानेश्वरीची गाथा व चिट्टी निदर्शनास आल्यामुळे त्यांचा शोध प्रशासनाने घेऊन इंद्रायणी नदीच्या बंधा-यांचे दोन दारे खुल्ले करून पाणी सोडून दिल्यावर दि. २८ आक्टोंबर रोजी दुपारी १२ च्या सुमारास त्यांचे प्रेत नदीपात्रात सापडले आहे. व्यंकटराव ढोपरे यांनी यापूर्वी मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून अनेक वेळा गावातील व तालूक्यातील मराठा बांधवाना सोबत घेऊन आरक्षणासाठी आंदोलनात सहभाग घेतला होता. त्यांनी आत्महत्या पूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती त्या चिठ्ठी मध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळणे गरजेचे आहे. आरक्षण नसल्यामुळे चांगले गुण घेऊन सुद्धा मराठा समाजातील मुला मुलींना शासकीय सेवेत संधी मिळत नाही. माझ्या मुलाला अनुकंपाखाली आईच्या जागेवर नौकरी मिळाली नाही. हे केवळ आरक्षणामुळे संधी हुकली सध्याचे राजकीय लोकप्रतिनिधी फसवणूक करीत आहेत. त्यामुळे माझ्या सारखे अनेक मराठा समाजातील तरुण आरक्षण मिळावे म्हणून आत्मदहन व आत्महत्या करतील असे त्यांनी चिट्ठी मध्ये मजकूर लिहीला आहे.
त्यांच्या पार्थिवावर मुळगावी उमरदरा येथे दि. २९ ऑक्टोंबर रोजी सकाळी १० वा . अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ जावाई असा परिवार आहे. जिल्ह्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून जिवाची परवा न करता समाजासाठी आपले बलिदान त्यांनी दिले त्यामुळे उमरदरा गावावर शोककळा पसरली आहे.