हिंगोली : हिंगोली-वाशिम महामार्गावर असलेल्या माळहिवरा शिवारामध्ये एका भरधाव पिकअप वाहनाने भाविकांना मागून येऊन धडक दिल्याने यामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेत चार जण जखमी झाल्याची माहिती आहे.
हिंगोली तालुक्यातील सिरसम येथील भाविक दर्शनाला जात होते. यामध्ये पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या वाहनाने भाविकांना चिरडले आहे.
सिरसम या गावचे भाविक दर शनिवारी सिरसम या ठिकाणावरून पायी माळहिवरा या ठिकाणी प्रसिद्ध असलेल्या हनुमान मंदिराच्या दर्शनासाठी जातात. यामध्ये पायी जात असताना हिंगोलीच्या दिशेकडून येणा-या भाजीपाल्याच्या रिकामे कॅरेट घेऊन जात असलेल्या पिकअप वाहनाने भाविकांना पाठीमागून धडक दिली.
अपघात एवढा भयानक होता की यामध्ये चार जणांचा जागेवरच मृत्यू झाला आहे.
यात सतीश शंकरराव थोरात (वय वर्षे २७), बालाजी बाबूराव इंगळे (वय वर्षे ३२), मनोज गोपाळराव इंगळे (वय वर्षे ३९), तर वैभव नंदू कामखेडे (वय वर्षे २२) यांचा या घटनेमध्ये मृत्यू झाला. तर जखमींमध्ये उत्तम संतोष गिरी, संतोष सीताराम वसु, राजकुमार भिकाजी घाटोळकर, जगन प्रल्हाद अडकिणे हे सर्व सिरसमचे रहिवासी आहेत.
हिंगोली ग्रामीण पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय राठोड यांच्या पथकाने या सर्वांना शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. तर रुग्णालयामध्ये जखमींवर तातडीने उपचार सुरू केले असून यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी नांदेड येथील रुग्णालयामध्ये नेले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. अपघातानंतर पिकअप चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून आता पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे.