वाशिम : कारंजा तालुक्यातील अडाण धरणात बुडून तिघांचा; तर दस्तापूर (ता. मंगरूळपीर) येथील धरणात बुडून एका मुलाचा मृत्यू झाला. या दोन्ही घटना १७ जून रोजी घडल्या. चारही मृतक मुले २० वर्षांआतील असून मुस्लिम समाजातील आहेत. ऐन ईद सणाच्या दिवशी घडलेल्या या ह्रदयद्रावक घटनेमुळे मृतकांच्या कुटूंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला.
दस्तापूरच्या घटनेसंबंधी मिर हिफाजत अली हाशम अली (आसेगाव पो.स्टे.) यांनी पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, त्यांचा भाचा शे. हुजेफ रियाजोद्दीन (१८, रा.मंगरूळपीर) हा त्याचे मित्र सकलैन शेख फहीम शेख, ओसामा नवाब साहेब, शिज आरीफ मास्टर आणि सै. मुवेद सै. सोहेल यांच्यासमवेत दुपारी १२.३० च्या सुमारास दस्तापूरच्या धरणावर गाडी धुण्यासाठी गेला. मात्र, धरणात उतरलेला शे. हुजेफ रियाजोद्दीन हा परत काठावर आला नाही, अशी माहिती दुपारी ३ वाजताच्या सुमारास मिळाली. त्यामुळे धरणाकडे धाव घेतली. आपत्ती व्यवस्थापन पथकाने शे. हुजेफचा शोध घेतला असता त्याचा मृतदेह पाण्यात आढळून आला. अशा फिर्यादीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
दरम्यान, दस्तापूर येथील धरणात बचावकार्य सुरू असतानाच कारंजा तालुक्यातील पिंपरी फॉरेस्टनजिकच्या अडाण धरणातही तिघे बुडाल्याची घटना घडली. कारंजातील भारतीपुरा येथील रहिवासी रेहान खान हाफीज खान (१९), साईम करीम शेख (१७) आणि इस्पान अली अर्षद अली (१५) ही तीन मुले अडाण धरणावर पोहण्यासाठी गेली होती. धरणातील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तिघांचाही बुडून मृत्यू झाला. संत गाडगेबाबा बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे व त्यांच्या संपूर्ण चमुने प्रयत्नांची पराकाष्ठा करून दोन्ही घटनांमधील मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळविले.
एकीकडे सणाचा उत्साह; दुसरीकडे आक्रोश
सोमवारी जिल्हाभरात बकरी ईदचा सण उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला. मात्र, याचदिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणच्या धरणांमध्ये बुडून २० वर्षांआतील चार मुलांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या आई-वडिलांचा व कुटूंबातील अन्य सदस्यांचा आक्रोश प्रत्येकाचे डोळे पानावणारा ठरला.