22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeसोलापूरग्रामीण हद्दीत चारजण येरवड्यात स्थानबध्द; ६१ जणांवर हद्दपारीची कारवाई

ग्रामीण हद्दीत चारजण येरवड्यात स्थानबध्द; ६१ जणांवर हद्दपारीची कारवाई

सोलापूर- लोकसभा निवडणुकीमुळे ग्रामीण हद्दीतील चार आरोपींवर एमपीडीए अन्वये स्थानबध्दतेची कारवाई करुन त्यांची पुण्याच्या येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली असून दोन टोळ्यांना मोक्का लावण्यात आला आहे. त्याचप्रमाणे ६१ इसमांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण हद्दीमध्ये निवडणुका शांततामय व भयमुक्त वातावरणामध्ये पार पडाव्यात या उद्देशाने जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांचीमाहिती संकलित करण्यात आली होती. त्यांचे सध्याचे वर्तन व आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने सामाजिक सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी, त्यांच्यावर स्थानबध्द, तडीपारचे प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून सादर करण्यात आले होते. जिल्हादंडाधिकारी व पोलीस अधीक्षक कार्यालयाने संयुक्तरीत्या कारवाई केली आहे.

सराईत गुन्हेगारांविरुध्द एमपीडीए कायद्याअंतर्गत ४ आरोपींची येरवडा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. त्यामध्ये बार्शी, माढा, सांगोला व मोहोळ तालुक्यातील गुन्हेगारांचासमावेश आहे.
तसेच जिल्ह्यात दोन किंवा दोन पेक्षा अधिक इसमांची टोळी करून सराईतपणे गुन्हे करणाऱ्या ५ गुन्हेगारी टोळ्या व त्यातील २० लोकांना वेगवेगळ्या कालावधीकरिता सोलापूर जिल्ह्यातून पोलीस अधीक्षकांनी हद्दपार केले आहे, त्याचप्रमाणे दोनपेक्षा जास्त गुन्हे असणारे व सामाजिक सुव्यवस्थेस बाधा आणणाऱ्या ४१ गुन्हेगारांना उपविभागीय दंडाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये हद्दपार करण्यात आले आहे. संघटितरीया एकत्र येऊन आर्थिक तसेच इतर फायदा मिळवण्याच्या उद्देशाने गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या दोन टोळीविरुध्द मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली असून त्यामध्ये एकूण ८ आरोपी आहेत.

पंढरपूर येथील टोळीविरुध्द दाखल गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस केला आहे. माढा तालुक्यातील टोळीविरुध्द दाखल गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील हे करत आहेत. जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांची देखील माहिती तथा प्रस्ताव अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्राप्त झाले आहेत.ही कारवाई जिल्हादंडाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर, नायब तहसीलदार (गृह) बनसोडे, सहायक फौजदार नीलकंठ जाधवर, पोलीस नाईक अनिस शेख आदींनी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR