40.1 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeधाराशिवअल्पवयीन शाळकरी मुलीला अश्लिल व्हिडीओ दाखविणा-या नराधमास सक्तमजुरी

अल्पवयीन शाळकरी मुलीला अश्लिल व्हिडीओ दाखविणा-या नराधमास सक्तमजुरी

धाराशिव : प्रतिनिधी
अल्पवयीन शाळकरी मुलीला वाईट उद्देशाने मोबाईलमधील अश्लिल व्हिडीओ दाखविल्या प्रकरणी एका नराधम आरोपीस न्यायालयाने ६ महिने सक्तमजुरी व २ हजार रूपये आर्थिक दंडाची शिक्षा सुनावली. ही घटना ५ फेब्रुवारी २०१९ रोजी साय्ंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास धाराशिव शहरात घडली होती.
या प्रकरणाची अतिरिक्त शासकीय अभियोक्ता सचिन सुर्यवंशी यांनी दिलेली माहिती अशी की, पिडीत अल्पवयीन शाळकरी मुलगी ही दि. ५ फेब्रुवारी २०१९ रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास तीच्या शाळेसमोर घरी जाण्यासाठी रिक्षाची वाट पहात थांबली होती.

त्यावेळी धाराशिव शहरातील गवळीवाडा, शिक्षक कॉलनी येथील नराधम उमाकांत गिरिधर महाबोले तीच्याजवळ आला. त्याने त्याच्या मोबाईल मधील अश्लिल व्हिडीओ दाखविला. माझ्यासोबत मैदानावर चल, मी तुला खूप पैसे देतो, असे म्हणाला. वाईट उद्देशाने त्या नराधमाने त्या अल्पवयीन शाळकरी मुलीचा लैंगिक छळ केला. या प्रकरणी पिडीत मुलीच्या आजीने धाराशिव शहर पोलीस ठाण्यात दि. ७ फेब्रुवारी रोजी फिर्याद दिली होती. या प्रकरणी नराधम उमाकांत महाबोले याच्या विरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलीसांनी त्या अनुषंगाने एका अनोळखी व्यक्तीला शोधून पोलीस स्टेशनला आणले. त्यावेळी त्याचे नाव उमाकांत गिरीधर महाबोले रा. शिक्षक कॉलनी, गवळी वाडा, धाराशिव असे असल्याचे समजले. गुन्हा नोंद झाल्यानंतर धाराशिव शहर पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस उपनिरिक्षक डी. यु. जाधव यांनी आरोपीच्या विरूध्द तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सदर दोषारोप पत्रावरून आरोपींच्या विरूध्द गुन्हा सिध्दीसाठी सरकार पक्षाच्यावतीने एकुण १० साक्षीदार तपासण्यात आले. सदर प्रकरणात पिडीता, तिची मावस बहिण, आजी व न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळा कलिना, मुंबई येथील सहाय्यक संचालक विशाल पावडे यांचा अहवाल व त्यांची साक्ष महत्वपुर्ण ठरली.

सदर प्रकरणाची सुनावणी तत्कालिन अतिरिक्त सह जिल्हा व सत्र न्यायाधीश धाराशिव एस. डी. जगताप यांचे समोर झाली. त्यानंतर न्यायाधीश एस. डी. जगताप हे सेवानिवृत्त झाल्यामुळे सदर प्रकरणाची अंतिम सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती अंजू शेंडे यांच्यासमोर झाली. न्यायालयासमोर आलेला साक्षीपुरावा व अतिरिक्त शासकीय अभियोक्ता सचिन सुर्यवंशी यांचा युक्तीवाद ग्रा धरुन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांनी आरोपी उमाकांत गिरीधर महाबोले यास बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे कलम १२ नुसार दोषी धरून आरोपीस सहा महिने सक्त मजुरीची शिक्षा तसेच २ हजार रूपये द्रव्यदंड अशी शिक्षा सुनावली. सदर प्रकरणात अतिरिक्त जिल्हा शासकीय अभियोक्ता यांना कोर्ट पैरवी पोलीस कॉन्स्टेबल विलास कांबळे धाराशिव शहर पोलीस स्टेशन यांनी सहकार्य केले. अभियोग पक्षाच्या वतीने अति. शासकीय अभियोक्ता सचिन सुर्यवंशी यांनी बाजू मांडली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR