नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) युको बँकेतील (यूसीओ बँक) ८२० कोटी रुपयांच्या फसवणुकीचा पर्दाफाश केला. १० ते १३ नोव्हेंबरदरम्यान झालेल्या या फसवणुकीचे सूत्रधार दोन इंजिनिअर असल्याचेही तपासात समोर आले आहे. खासगी बँकांच्या १४ हजार खात्यांमधून या दोन पट्टयांनी युको बँकेच्या ४१ हजार बँक खात्यांमध्ये पैसे पाठवले होते. या फसवणुकीसाठी ८.५३ लाख आयएमपीएस ट्रान्सफर करण्यात आले होते. यानंतर बँकेने तात्काळ कारवाई करत आयएमपीएस सेवेवर बंदी घातली. या प्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाच्या तपासादरम्यान सीबीआयने कोलकाता आणि मंगळुरूसह अनेक शहरांमध्ये १३ ठिकाणी छापे टाकले. अधिका-यांनी सांगितले की, अचानक पैसे आल्यानंतर अनेकांचा गोंधळ उडाला. पण काहींनी पैसे काढून घेतले. आश्चर्याची बाब म्हणजे ज्या खासगी बँकांमधून पैसे काढण्यात आले, त्यांच्या १४ हजार खात्यांमधून पैसे कापले गेले नाहीत. युको बँकेच्या केवळ ४१ हजार खात्यांमध्ये पैसे आले होते. युको बँकेला तीन दिवसांनंतर ही बाब कळताच त्यांनी सीबीआयकडे त्यांच्या दोन सपोर्ट इंजिनीअर्सविरोधात तक्रार दाखल केली. सीबीआयच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, तपास यंत्रणेने या इंजिनिअर्ससह आणखी एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान, मोबाईल फोन, लॅपटॉप, कंम्प्युटर, ईमेल अर्काइव आणि डेबिट/क्रेडिट कार्डसह अनेक इलेक्ट्रॉनिक पुरावे देखील जप्त करण्यात आले आहेत.
फेल ट्रान्जॅक्शन दाखवत लुटलं
युको बँकेच्या वतीनं दिलेल्या माहितीनुसार, या फसवणुकीत, ज्या खात्यांमधून पैसे ट्रान्सफर केले गेले होते ते फेल ट्रान्जॅक्शन असल्याचं सिस्टिममध्ये दाखवलं जात होतं. पण, युको बँकेच्या खात्यात पैसे येत होते. हा पैसाही अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारे खर्च केला. तसेच, इतर खात्यांमध्ये हस्तांतरित केला.