नागपूर/पुणे/मुंबई : राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. तीन पक्षांच्या घोटाळेबाज सरकारचा हा परिपाक आहे. कधी नव्हे तो राज्यात गुंडाचा मुक्त संचार होत आहे. ज्या गुंडांनी गोळ्या झाडल्या तो पूर्ण प्लॅन होता. त्यानंतर स्वत:वर गोळ्या झाडण्याचा प्रयत्न हे मोठे षड्यंत्र आहे. घोसाळकर यांचा खून प्लॅन करुन करण्यात आला आहे. हे भांडण राजकीय वर्चस्वासाठी असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
वडेट्टीवार म्हणाले, यापूर्वी सत्ताधारी आमदार पोलीस स्टेशन मध्ये गोळी झाडतो. ज्या घटना सत्ताधा-यांकडून होत आहेत, पोलिस हमारे साथ आहेत अशी मस्ती आली आहे. दुसरीकडे राज्य वा-यावर सोडून सत्ता व संपत्ती टिकवण्यासाठी सत्तेचा वापर केला जात आहे, जनतेचे काहीही घेण देणे नाही. गृहमंत्री हतबल झालेले दिसत आहेत. राणे यांच्या वक्तव्यावर बोलताना ते म्हणाले, काही लोकांच्या तोंडाला झाकण नसते. काही लोक केवळ सत्तेत राहण्यासाठी धडपडत आहेत. भाजप नेते बावनकुळे यांच्या आंदोलनासंदर्भात बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी जे बोलले ते सत्य आहे. त्यावेळी त्या समाजाला ओबीसीमध्ये का घेतले नाही? ओबीसींचा सत्यानाश करायचा जीआर निघाला, त्यावेळी बावनकुळे का बोलले नाही? खरेतर बैठक न घेता मराठा समाजासाठी जीआर काढला, यावर तुम्ही राजीनामा द्यायला पाहिजे, असेही वडेट्टीवार म्हणाले.
गुंडांना पोलिसी खाक्या दाखवा : अजित पवार
सोशल मीडियावर गुंड रिल्स प्रसारीत करत आहे. त्यांच्यावर पोलिस कारवाई करणार आहे. एवढं करून कोणाची मस्ती असेल तर पोलिसी खाक्या दाखवायला लागेल. पुण्याचे पोलिस आयुक्त आज नाशिकमध्ये आहेत. यामुळे पुणे सीपी आणि पुणे ग्रामीण एसपी यांना सूचना दिल्या आहेत असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. घोसाळकर यांच्या हत्येबाबत अजित पवार म्हणाले, हा व्हीडीओ पाहिल्यानंतर अभिषेक आणि मॉरीस यांच्यात चांगला संवाद दिसतो. त्यांच्यात मित्रत्वाचे संबंध दिसत होते.
नाकर्तेपणाची किंमत जनतेने चुकवावी का? : सुळे
राज्यात भाजपा आमदार गणपत गायकवाड म्हणाले त्याप्रमाणे अधिकृतपणे गुंडाराज सुरु झाले आहे का? नेत्यांचे दिवसाढवळ्या खून होत आहेत. याचाच अर्थ राज्याच्या गृहमंत्री महोदयांचे त्यांच्या स्वत:च्या खात्याकडे अजिबात लक्ष नाही. त्यांच्या या दुर्लक्षामुळे कायदा सुव्यवस्था पुर्णत: ढासळली आहे. गृहमंत्र्यांच्या नाकर्तेपणाची किंमत सर्वसामान्य जनतेने का चुकवावी? असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
सत्ताधा-यांकडून महाराष्ट्राचा बिहार : ठाकूर
महाराष्ट्र हा पुरोगामी राज्य म्हणून ओळखल्या जातो. महाराष्ट्राचा बिहार करण्याचा प्रयत्न करणा-यांना महाराष्ट्र माफ करणार नाही. जर महाराष्ट्राचा पुरोगामी विचार आणि महाराष्ट्राचे चरित्र सांभाळता येत नसेल तर, सत्ताधा-यांनी, मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तत्काळ आपले राजीनामे दिले पाहिजे. अशी मागणी करत आमदार यशोमती ठाकूर यांनी सत्ताधा-यांवर टीकास्त्र डागले आहे.