बीड : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील एक प्रमुख आरोपी असणा-या सुदर्शन घुलेला कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी घुलेच्या आवाजाचे नमुने घेतले असून यामुळे त्याच्या अडचणींत चांगलीच वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
आरोपी सुदर्शन घुले याच्यावर संतोष देशमुख यांचे अपहरण व हत्येचा आरोप आहे. याशिवाय त्याच्यावर आवादा पवनचक्की कंपनीकडून २ कोटींची खंडणी वसूल केल्याचाही आरोप आहे. त्याची पोलिस कोठडी आज संपणार होती. तत्पूर्वी, सीआयडीचे उपअधीक्षक अनिल गुजर यांनी त्याला केज न्यायालयाच्या प्रथम वर्ग न्यायाधीश एस. व्ही. पावसकर यांच्या न्यायालयात हजर केले. तिथे त्याच्या पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली. यावेली आरोपीचे वकील अनंत तिडके व सरकारी वकील जे बी शिंदे यांच्यात जोरदार युक्तिवाद झाला. त्यानंतर घुलेची रवानगी १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत केली.
बीड जिल्हा कारागृहात रवानगी
कोर्टाच्या आदेशांनुसार आता सुदर्शन घुलेला बीड जिल्हा कारागृहात हलवण्यात आले आहे. तो तिथे १४ दिवस राहील. दुसरीकडे, पोलिसांनी सुदर्शन घुलेच्या आवाजाचे नमुणे घेतले आहेत. ते तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात येणार आहेत. त्याचा अहवाल सकारात्मक आला तर सुदर्शन घुलेचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आंधळे अद्यापही फरार
उल्लेखनीय बाब म्हणजे संतोष देशमुख यांची गत ९ डिसेंबर २०२४ रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे व कृष्णा आंधळे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. कृष्णा आंधळे वगळता इतरांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. पण कृष्णा अजूनही फरार आहे. त्याचा कसून शोध घेतला जात आहे. मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड याला या प्रकरणाशी संबंधित खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली आहे.