नाशिक : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत अडचणीत आले आहेत. गिरणा कारखान्यात मंत्री दादा भुसे यांनी १७८ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप राऊत यांनी केला होता. या प्रकरणी दादा भुसे यांनी संजय राऊत यांच्यावर मानहानीचा दावा दाखल केला होता. या प्रकरणात २ डिसेंबरला संजय राऊत यांना न्यायालयाने जामीन दिला. परंतु आज ३ फेब्रुवारी रोजी संजय राऊत नियमित सुनावणीसाठी हजर झाले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने त्यांना चांगलेच फटकारले. वायफळ बडबड करण्यापेक्षा पुरावे द्या, असे कोर्टाने त्यांना बजावले.
न्यायालयाकडून नाराजी
मालेगाव न्यायालयात खासदार संजय राऊत यांच्यावर दाखल केलेल्या मानहानी दाव्याची सुनावणी आज होती. परंतु या सुनावणीत शिवसेना नेते खासदार संजय राऊत गैरहजर राहिले. परंतु मंत्री भुसे यांनी न्यायालयात हजर राहून साक्ष नोंदविली. राऊत गैरहजर राहिल्यामुळे कोर्टाने नाराजी व्यक्त केली. राऊत यांनी वायफळ बडबड करण्यापेक्षा पुरावे सादर करावे, या शब्दांत न्यायालयाने वकिलामार्फत राऊतांना सुनावले.
काय आहे प्रकरण
दैनिक सामना या वृत्तपत्रात गिरणा सहकारी साखर कारखान्याबाबत संजय राऊत यांनी वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यामध्ये दादा भुसे यांनी १७८ कोटी रुपयांचा शेअर्स घोटाळा केल्याचा आरोप केला होता. यामुळे दादा भुसे यांनी संजय राऊत यांनी माफी मागावी अन्यथा त्यांच्यावर बदनामी केल्याचा खटला दाखल करण्याचा इशारा दिला होता. संजय राऊत यांनी माफी मागण्यास नकार दिला. त्यानंतर दादा भुसे यांनी त्यांच्या विरोधात मालेगाव अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता.
आता संजय राऊत सुनावणीस हजर राहिले नाहीत. यामुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची न्यायालयास विनंती करणार असल्याचे मंत्री भुसे यांनी म्हटले.
राऊत वारंवार गैरहजर
२३ ऑक्टोबर रोजी संजय राऊत यांना मालेगाव न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश दिले होते. परंतु त्यावेळी ते हजर राहिले नाहीत. दसरा मेळाव्याचे कारण त्यांनी दिले होते. त्यानंतर ४ नोव्हेंबर रोजी त्यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते. परंतु त्यावेळीही ते हजर राहिले नाहीत.