लातूर : प्रतिनिधी
आरक्षण मिळाल्यानंतरच आमच्या लेकराबाळांना सुखाचे दिवस येणार आहेत. शेतीतून उत्पन्न निघत नसल्याने आणि हाती पैसा नसल्याने त्यांच्या शिक्षणात अडसर येत आहे. हे बघून आमचं काळीज तुटत आहे. आता अंत बघू नका आम्हाला ५० टक्क्याच्या आत ओबीसीमधून कुणबी म्हणून टिकणारे आरक्षण द्या, असा आर्जव येथील जिल्हाधिका-यांना मांजरा पट्ट्यातील सात गावांतील मराठा महिला व बांधवांनी केला.
लातूर तालुक्यातील नागझरी येथे बुधवारी सकाळी नागझरी, टाकळी (ब.), जेवळी, रायवाडी, हरंगुळ (खू), सांगवी, इंदरठाणा येथे ही मंडळी जमली तेथून महिलां, लहान मुले व ज्येष्ठ हे बैलगाड्या व ट्रॅक्टरनी तर युवक पायी लातुरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मराठा आरक्षणाच्या समर्थनात घोषणाबाजी व छत्रपती शिवरायांचा जयजयकार करीत मार्गस्थ झाले. लातूर येथे आले असता त्यांनी येथील पू. अहिल्यादेवी चौकात पू. अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याला तर छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. सरकार तसेच मराठा लोकप्रतिनिधींच्या विरोधात घोषणाबाजी करीत ते दुपारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोहचले. त्यांनी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना निवेदन सादर केले.
आरक्षणाच्या मुख्य मागणीसह जातनिहाय जनगणना करावी, मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, अशा मागण्याही त्यांनी केल्या. आमची हाक सरकारपर्यंत पोहचवा, अशी विनंती त्यांनी जिल्हाधिका-यांना केली. जिल्हाधिका-यांनीही आस्थेवाईकपणे त्यांच्याशी संवाद सादत त्यांच्या विनंतीला होकार भरला. मराठा आरक्षणाच्या समर्थनात या गावातील मुस्लिम बांधवही आले होते. निवेदन दिल्यानंतर या मंडळीनी सोबत आणलेली भाजी- भाकरी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात खाल्ली, बैलांना चारा, पाणी केले आणि गावचा रस्ता धरला.