नवी दिल्ली/मुंबई : सोने चांदी खरेदी करण्याचा विचार करणा-यांसाठी मोठी बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. बुधवारी देशांतर्गत वायदे बाजारात सोन्याचा भाव एका दिवसात तब्बल ३,२०० रुपयांनी घसरला. तर चांदीच्या दरातही मोठी घट झाली. चांदीचा भाव एका दिवसात जवळपास ५,९०० रुपयांनी कमी झाला. त्यामुळे बाजारात खळबळ उडाली आहे.
या घसरणीमागे अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेच्या व्याजदरांबाबतच्या भूमिकेचा परिणाम असल्याचे सांगितले जात आहे. डिसेंबरमधील बैठकीत अमेरिकेची मध्यवर्ती बँक व्याजदर वाढवू शकते, अशी शक्यता काही अहवालांमध्ये व्यक्त करण्यात आली आहे. भविष्यातही व्याजदर वाढण्याची शक्यता असल्याने गुंतवणूकदारांनी सोने आणि चांदीमधील गुंतवणूक कमी करण्यास सुरुवात केली आहे. चांदीच्या दरातही मोठी घट झाली आहे. चांदीचा भाव किलोमागे ४,४०० रुपयांनी घसरून १,६४,५०६ रुपयांवर आला आहे. दिल्लीपासून मुंबईपर्यंत देशातील अनेक सराफा बाजारांमध्ये या घसरणीचा परिणाम दिसून येत आहे.सोने आणि चांदीच्या दरात झालेली घसरण किती मोठी आहे, हे त्यांच्या विक्रमी किमतींवरून लक्षात येते. जानेवारी महिन्यात सोन्याचा भाव १.९३ लाख रुपये प्रति १० ग्रॅम या विक्रमी पातळीवर पोहोचला होता. मात्र, आता तो घसरून जवळपास १.३१ लाख रुपयांवर आला आहे. म्हणजेच सोन्याच्या दरात आतापर्यंत जवळपास ६४ हजार रुपयांची घसरण झाली आहे.
एमसीएक्सवर सोने-चांदीचे दर किती घसरले?
बुधवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली. १० ग्रॅम सोन्याचा भाव ३,२०० रुपयांनी म्हणजेच २.३८ टक्क्यांनी घसरून १,३१,०२७ रुपयांवर आला. दुसरीकडे, चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली. चांदीचा भाव किलोमागे ५,९०० रुपयांनी म्हणजेच ३.४७ टक्क्यांनी कमी होऊन १,६३,८१८ रुपयांवर पोहोचला. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरांबाबत महत्त्वाचे संकेत मिळत असल्याने जागतिक बाजारातही सोने आणि चांदीवर दबाव निर्माण झाला आहे. व्याजदर वाढल्यास गुंतवणूकदारांचा कल रोखे आणि इतर व्याज देणा-या गुंतवणूक पर्यायांकडे वाढू शकतो. त्यामुळे सोने आणि चांदीसारख्या मालमत्तांची मागणी कमी होण्याची शक्यता आहे.
सराफा बाजारातही सोन्याचे दर घसरले
केवळ वायदे बाजारातच नाही, तर देशातील सराफा बाजारातही सोन्या-चांदीच्या किमती कमी झाल्या आहेत. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या आकडेवारीनुसार, २४ कॅरेट सोन्याचा दर ३,००० रुपयांनी घसरून १,३१,५०५ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा भाव जवळपास २,९०० रुपयांनी कमी होऊन १,२०,४५९ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. १८ कॅरेट सोन्याचा दर ९८,६२९ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातही मोठा फटका
जागतिक बाजारातही सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव २.१५ टक्क्यांनी घसरून ३,७८०.४० डॉलर प्रति औंस झाला आहे. तर चांदीचा भाव ३.१५ टक्क्यांनी कमी होऊन ४५.८६५ डॉलर प्रति औंसवर आला आहे.
















