मुंबई : आपल्या भारतीयांसाठी सोने हे केवळ गुंतवणुकीचे साधन नसून ते समृद्धीचे प्रतीक आहे. यामुळेच गेल्या काही वर्षांत सोन्याच्या मागणीत वाढ झाल्याने त्याच्या दरातही झपाट्याने वाढ झाल्याचं दिसतंय. शनिवारी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याची किंमत 73,020 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकी आहे. आता देशात सणांचा हंगाम सुरू झाला आहे.
त्यामुळे येत्या धनत्रयोदशीला सोन्याची मागणी विक्रमी उच्चांक गाठण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यानंतर लगेच लग्नाचा हंगाम सुरू होईल. ज्यामध्ये सोन्याच्या मागणीत सातत्यता आहे. अशा परिस्थितीत सोन्याची मागणी आणि त्याचे दर येत्या तीन महिन्यांपर्यंत वाढू शकतात.
चालू आर्थिक वर्षांत सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. जगात सुरू असलेल्या अनेक युद्धांमुळे आणि देशांतर्गत वाढत्या मागणीमुळे सोन्याची विक्रमी विक्री झाली आहे. जगातील अनेक केंद्रीय बँकांनी सातत्याने सोने खरेदी केले आहे. त्यामुळे सोन्याचे भाव वाढतच गेले.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात कस्टम ड्युटी कमी केली. त्यामुळे सलग काही दिवस सोने स्वस्त झाले. पण पुन्हा वेगाने झेप घेऊन पुढे जाण्यास सुरुवात झाली आहे. आता असे मानले जात आहे की पुढील 3 महिन्यांत सोन्याचे भाव विक्रम मोडू शकतात.
अर्थसंकल्पानंतर सोन्याच्या दरात झालेली घसरण आता कमी झाली आहे. भारतात सोन्याची मागणी नेहमीच जास्त असते. ही मागणी वाढवण्यात ज्वेलर्सची भूमिका महत्त्वाची आहे. सण आणि लग्नसराईमुळे दागिन्यांची मागणी वाढेल आणि त्यामुळे दरातही वाढ होण्याची शक्यता आहे. लोक अधिक सोने खरेदी करतील अशी पूर्ण आशा आहे. धनत्रयोदशीला सर्वाधिक विक्री होऊ शकते. याशिवाय फेडरल रिझर्व्हनेही व्याजदरात कपात करण्याचे संकेत दिले आहेत.
दोन आठवड्यांत सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ होणार
येत्या दोन आठवड्यांत सोन्याच्या किमतीत 1 टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते असं तज्ज्ञांचे मत आहे. पुढच्या तीन महिन्यांत हा ट्रेंड आणखी तीव्र होईल. चांदीच्या दरातही वाढ होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. येत्या 15 दिवसांत चांदीच्या दरातही अर्ध्या टक्क्यांनी वाढ होऊ शकते.
सोन्या-चांदीच्या किमतीवर जगात सध्या सुरू असलेले संकट, देशांतर्गत मागणी आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य याचा मोठा परिणाम होतो. सणासुदीचा हंगाम आणि विवाहसोहळा नेहमी ज्वेलर्स आणि सराफा व्यापाऱ्यांसाठी चांगली बातमी घेऊन येतो. यंदाही तेच होण्याची अपेक्षा आहे.