धाराशिव : प्रतिनिधी
कळंब तालुक्यातील दहिफळ येथून एका सोनाराचे १९ लाख ३५ हजार २३८ रूपये किंमतीचे सोने एकाने लंपास केले. ही घटना २६ नोव्हेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी पश्चिम बंगाल राज्यातील एका व्यक्तीवर येरमाळा पोलीस ठाणे येथे २८ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाभळगाव ता. कळंब येथील अनिरुध्द नागनाथ पंडीत यांनी अंदाजे १९ लाख ३५ हजार २३८ रूपये किंमतीचे २२ कॅरेटचे ३४२ ग्रॅम ५२० मिली वजनाचे सोने हे डायी, बॉल, चेक्स, पट्टे, जाळी, सोन्याची तार बणवण्यासाठी राजू रंगनाथ सामंत यांना दिलेले होते. आरोपी राजू रंगनाथ सामंत याने दहिफळ येथील श्री ज्वेलर्स दुकानाच्या बाजूच्या गाळ्यामधून अनिरुध्द पंडीत यांना न विचारता सोने घेऊन गेला व फसवणूक केली. या प्रकरणी अनिरुध्द पंडीत यांनी दि.२८ रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पोलीस ठाणे येथे कलम ४२०, ४०६ भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.