नांदेड : प्रतिनिधी
नांदेडमधील विधानसभेच्या ९ जागेवर महायुतीच्या उमेदवारांनी विजयाचा झेंडा रोवला आहे. महाविकास आघाडीला खातेही उघडता आले नाही तर राज्यभरात सर्वांचे लक्ष लागलेल्या माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांनी भोकर मतदारसंघातून विजय मिळविला.
नांदेड जिल्ह्यातील विधानसभेसाठी महायुतीविरूद्ध महाविकास आघाडी अशी लढत झाली. यात भोकर मतदार संघातून माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांनी विजय मिळवित कॉगे्रसचे पप्पू कोंढेकर यांचा पराभव केला. नायगाव मतदारसंघातून भाजपचे आ. राजेश पवार यांनी डॉ. मीनल खतगावकर यांना पराभूत केले. मुखेड मतदारसंघात भाजपचे आ. तुषार राठोड, काँग्रेस उमेदवार हनमंत पा. बेटमोगरेकर व अपक्ष उमेदवार बालाजी खतगावकर यांच्यात लढत झाली. यात डॉ. तुषार राठोड यांनी तिस-यांना विजय मिळविला.
मागासवर्गीय प्रवगार्साठी राखीव देगलूर मतदारसंघात आ. जितेश अंतापूरकर यांनी विजय मिळविला. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे निवृत्ती कांबळे, माजी आमदार सुभाष साबणे यांना पराभुत केले. लोहा विधानसभा मतदारसंघात माजी खा. प्रताप पाटील चिखलीकर यांनी विजय मिळविला. त्यांच्या विरोधात उबाठा शिवसेनेचे एकनाथ पवार, चिखलीकर यांच्या भगिनी आशाताई शिंदे यांनी लढत दिली. नांदेड उत्तर मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लाडके आमदार बालाजी कल्याणकर यांनी दुस-यांदा मताधिक्य घेऊन विजय मिळविला.
काँग्रेसचे उमेदवार अब्दुल सत्तार, उबाठा सेनेच्या संगीत डक यांना पराभूत केले. नांदेड दक्षिणमधून शिवसेनेचे आनंद बोंढारकर यांनी विद्यमान आ. मोहन हंबर्डे यांचा पराभव करून विजय मिळविला. हदगाव विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे बाबुराव कदम कोहळीकर यांनी काँग्रेसचे आ. माधवराव पाटील जवळगावकर यांचा पराभव केला. किनवट मतदारसंघात झालेल्या लढतीत आ. भीमराव केराम यांनी पुन्हा विजय मिळवित राष्ट्रवादीचे माजी आ. प्रदिप नाईक यांचा पराभव केला.