चेन्नई : भारतीय संघाने २ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात बांगला देशचा तब्बल २८० धावांनी पराभव केला. भारताने बांगला देशला विजयासाठी ५१५ धावांचे आव्हान दिले होते आणि २३४ धावांवर बांगलादेशला ऑल आऊट करत कसोटी मालिकेत १-० ने आघाडी मिळवली. रविचंद्रन अश्विनच्या ६ विकेट्सच्या जोरावर भारताने दुस-या डावात एकतर्फी दबाव आणला.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना टीम इंडियाने मोठ्या सहजतेने जिंकला. भारताच्या विजयात आर अश्विनची भूमिका महत्त्वाची होती. आर अश्विनने पहिल्या डावात शतक झळकावत भारताचा डाव सावरला आणि दुस-या डावात विक्रमी ६ विकेट्स घेत भारताला ऐतिहासिक विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली.
भारतीय क्रिकेट संघाने १९३२ साली कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून भारताने ५८० सामने खेळले आहेत. ९२ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच टीम इंडियाने पराभवापेक्षा जास्त विजयाचा आकडा गाठला. बांगलादेशचा पराभव करून टीम इंडियाने कसोटी क्रिकेटमधील १७९वा विजय संपादन केला आहे तर संघाला १७८ सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. आतापर्यंत भारतातील कसोटी क्रिकेटच्या ९२ वर्षांच्या इतिहासात असे घडले नव्हते. भारताने २२२ सामने अनिर्णित खेळले आहेत तर भारताचा एक सामना रद्द झाला आहे.
‘ही’ कामगिरी करणारा भारत ठरला पाचवा संघ
कसोटी क्रिकेटमध्ये पराभवापेक्षा जास्त विजय नोंदवणारा भारत जगातील पाचवा संघ ठरला आहे. याआधी ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तानच्या संघांनी अशी कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाने ८६६ सामन्यांपैकी ४१४ सामने जिंकले आणि २३२ सामने गमावले. इंग्लंड संघाने १०७७ सामन्यांपैकी ३९७ सामने जिंकले असून ३२५ सामने गमावले. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ४६६ कसोटी सामन्यांपैकी १७९ सामने जिंकले आहेत आणि १६१ सामने गमावले. पाकिस्तानने ४५८ सामन्यांपैकी १४८ सामने जिंकले आणि १४४ सामने गमावले.