18.6 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeसंपादकीय विशेषग्रॅमीत भारताचा डंका

ग्रॅमीत भारताचा डंका

भारतीय संगीत अभिजात असून ग्रॅमीसारख्या विविध आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यांत वेळोवेळी भारतीय संगीतकारांची छाप राहिली आहे. पंडित रविशंकर यांच्यापासून ते गायक शंकर महादेवनपर्यंतच्या वाटचालीत भारतीय संगीतकारांचा बोलबाला राहिला आहे. पाश्चिमात्त्य संगीताच्या दणदणाटात शास्त्रीय संगीताची झुळूक ही नक्कीच जगाला सुखावणारी ठरली आहे. यंदाच्या ग्रॅमी पुरस्कारांवर भारताच्या पाच कलाकारांनी उमटविलेला ठसा त्याचीच पावती आहे.

गीत विश्वातील सर्वांत प्रतिष्ठित ग्रॅमी पुरस्काराच्या ६६ व्या सोहळ्यात भारताच्या पाच कलाकारांनी आठ पुरस्कारांवर मोहर उमटविली. या सन्मानाने देशाच्या गौरवात भर पडली आणि देशवासीयांसाठी अभिमानास्पद क्षण राहिला. एवढेच नाही तर भारतीय शास्त्रीय संगीताला एका मर्यादेत बंदिस्त करता येत नाही, हे देखील सिद्ध झाले. म्हणूनच उस्ताद झाकिर हुसेन हे वयाच्या ७२व्या वर्षी एकाचवेळी आंतरराष्ट्रीय पातळीवरचे तीन सन्मान पटकावणारे पहिले भारतीय संगीतकार ठरले. ‘ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्स’ श्रेणीत त्यांचा आणि बासरीवादक राकेश चौरसिया यांचा ‘पश्तो’ अल्बम विजयी ठरला. राकेश चौरसिया हे दिग्गज बासरीवादक हरिप्रसाद चौरसिया यांचे पुतणे. त्याचवेळी ‘बेस्ट कंटम्परेरी इंस्ट्रुमेंटल’ अल्बमसाठी याच जोडीला ‘एज वुई स्पीक’ अल्बमसाठी पुरस्कार मिळाला. भारतीय फ्युजन बँड ‘शक्ती’नेही ग्रॅमीवर नाव कोरले. त्याचा प्रारंभ १९७३ रोजी ब्रिटनचे गिटारवादक जॉन मॅकघॉलिनने केली होती. यात भारतीय व्हायोलिनवादक एल. शंकर, तबलावादक झाकिर हुसेन आणि टी. एच. विक्कू ‘विनायक राम’ यांचा समावेश होता. ४५ वर्षांनंतर गेल्यावर्षी जून महिन्यात प्रदर्शित झालेला अल्बम ‘धिस मोमेंट’ला बेस्ट ग्लोबल म्युझिक अल्बम श्रेणीत पुरस्कार मिळाला. ही बाब कलाकारांचे संगीतप्रेम आणि निष्ठा याचे दर्शन घडवते. सध्या या बँडमध्ये झाकिर हुसेन आणि संगीतकार शंकर महादेवन यांच्याव्यतिरिक्त जॉन मॅकलॉघलिन, व्ही. सेल्वागणेश आणि गणेश राजगोपालन यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी लिखित गीत ‘अंबडेन्स इन मिलेट्स’ देखील ग्रॅमीच्या शर्यतीत होते.

तबलावादक झाकिर हुसेन यांना यापूर्वी ग्रॅमी सन्मान मिळाला आहे. मात्र शंकर महादेवन यांच्या कारकीर्दीतील हा पहिलाच ग्रॅमी पुरस्कार आहे. शंकर महादेवन हे केवळ यशस्वी गायक आणि संंगीतकार नाहीत तर त्यांचा शास्त्रीय संगीताचा प्रचंड अभ्यास आहे. शंकर महादेवन यांना लहानपणापासूच संगीतवाद्याचे वेड. एकदा ते आपल्या मामाकडे गेले होते आणि तेथे हार्मोनियम होता. शंकर महादेवन यांनी हार्मोनियम वाजवण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे शंकर यांनी संगीताचे कोणतेही धडे घेतलेले नव्हते. त्याचवेळी महादेवन कुटुंबीयांना त्याचे संगीतप्रेम कळून चुकले. शंकर यांचे कुटुंबीय मुंबईला राहत होते. त्यांनी टी.आर. बालमणी यांच्याकडून कर्नाटक संगीताचे शिक्षण घेतले. याशिवाय मराठी संगीतकार श्रीनिवास खळे यांच्याकडे मराठी भावगीत रचना शिकल्या. त्यांना वीणा या वाद्यतंत्राचे कमालीचे वेड. ते कॉम्प्युटर सायन्सचे अभियंते आहेत. त्यांना अमेरिकेत नोकरी देखील मिळाली होती. पण संगीताचा मार्ग निवडावा की अमेरिकेतील गलेलठ्ठ पगाराची नोकरी, अशा द्विधा मन:स्थितीत ते होते. परंतु त्यावर तोडगा कुटुंबीयांनीच काढला. नोक-या तर शेकडो मिळतील, परंतु तुझ्यासारखा संगीतकार कोठे भेटेल? अशा शब्दांत प्रेरणा देत त्यांचा संगीतकाराचा मार्ग सुकर केला.

त्यांनी कुटुंबीयांचा विश्वास सार्थ ठरविला. चित्रपट संगीत आणि शास्त्रीय संगीत याचा मेळ बसविणे तसे कठीण. मात्र शंकर महादेवन यांनी ही किमया साधली. ब्रेथलेस या अल्बमने त्यांना लोकप्रियता मिळाली आणि ती आजतागायत कायम आहे. ग्रॅमी पुरस्कार हा त्यांच्या मेहनतीचा कळस आहे. जगभरातील संंगीतकारांचे कौतुक करणा-या ग्रॅमी पुरस्काराची सुरुवात १९५९ मध्ये झाली. दरवर्षी हा पुरस्कार अमेरिकेच्या नॅशनल अकादमी ऑफ रिकॉर्डिंग आर्टस् अँड सायन्सेजकडून दिला जातो. पहिल्या पुरस्कार सोहळ्यात २८ ग्रॅमी पुरस्कार दिले होते. कालांतराने संगीत क्षेत्रात वैविध्यपणा आला आणि पुरस्कारांची संख्याही वाढली. पण २०११ मध्ये संयोजकांनी अनेक श्रेणीत कपात केली आणि पुरस्कारांची संख्या १०९ वरून ७८ वर आणली. यावर्षी एकूण ९४ श्रेणीत पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. ग्रॅमी पुरस्काराचे भारताशी नाते जुनेच आहे. नामांकित सतारवादक पंडित रविशंकर हे १९६८ मध्ये ग्रॅमी पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय कलाकार ठरले. भारतीय संगीताची पश्चिमेत लोकप्रियता वाढवणे आणि अमेरिकी व ब्रिटन संगीतावर प्रभाव निर्माण केल्याने त्यांना २०१३ मध्ये मरणोत्तर ग्रॅमी जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला.
झुबिन मेहता हे संगीत क्षेत्रातील दिग्गज म्हणून ओळखले जातात.

त्यांचे २३ वेळेस नामांकन झाले होते आणि त्यापैकी त्यांना पाच वेळेस सन्मान मिळाला. टी. एच. विनायकरम हे दक्षिणेतील मोठे संगीतकार. त्यांना एकदाच ग्रॅमी पुरस्कार मिळाला. विनू विनायकरम यांना झाकिर हुसेन यांच्यासमवेतच्या जुगलबंदीमुळे हा सन्मान मिळाला. ए. आर. रेहमान यांचे जगभरात चाहते आहेत. त्यांना दोनदा ग्रॅमी मिळाला आहे. ‘स्लमडॉग मिलेनियर’मधील ‘जय हो’ या गाण्यासाठी ग्रॅमी मिळाला. नीला वासवानी यांना नोबल शांतता सन्मान विजेत्या मलाला युसूफजाई यांचे आत्मचरित्र ‘आयएम मलाला’ या ऑडिओबुकच्या कथनासाठी ग्रॅमी मिळाला. २०१५ मध्ये मुलांसाठीच्या सर्वोत्तम अल्बमच्या श्रेणीत त्यांना ग्रॅमी मिळाला होता आणि असा सन्मान मिळवणा-या त्या एकमेव भारतीय ठरल्या. रिक केज यांना दोनदा ग्रॅमी मिळाला आहे. २०१५ मध्ये ‘विंड्स ऑफ समसारा’ आणि २०२२ च्या ‘डिव्हाईन टाईड’ साठी ग्रॅमी मिळाला. झाकिर हुसेन यांना यापूर्वीही दोनदा सन्मान मिळाले. आजही त्यांनी तीन सन्मान मिळवले आहेत. ग्रॅमी विजेत्यांत फाल्गुनी शहा यांच्याही नावाचा समावेश करता येईल. त्यांना ‘अ कलरफुल वर्ल्ड’साठी २०२२ मध्ये पहिला ग्रॅमी मिळाला.

शास्त्रीय संगीताला बदलविरोधी म्हणून म्हटले जाते, परंतु यावेळी ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात भारतीय फ्युजनचा झालेला गौरव पाहता शास्त्रीय संगीतात परदेशी संगीत सामावून घेण्याचे सामर्थ्य असल्याचे निदर्शनास आले. तेलगू चित्रपट ‘आरआरआर’च्या ‘नाटू-नाटू’ गीताने गेल्यावर्षी ऑस्कर पटकावला. आता या दिग्गज कलाकारांना प्रतिष्ठित ग्रॅमी पुरस्कार मिळाल्याने भारतात शास्त्रीय संगीत ऐकणा-यांची संख्या निश्चित वाढेल आणि त्यामुळे नव्या पिढीतील कलाकारांना मोठे स्वप्न पाहणे आणि शास्त्रीय संगीताप्रती रुची वाढविण्यास प्रेरणा मिळेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR