22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रपुणे ‘मनसे’मध्ये गटबाजी, संतप्त राज ठाकरे मुंबईत परतले

पुणे ‘मनसे’मध्ये गटबाजी, संतप्त राज ठाकरे मुंबईत परतले

पुणे : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यात विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी आले होते. पण पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्तेच वेळेवर न आल्याने राज ठाकरे संतापले. त्यामुळे या संतापाच्या भरातच राज ठाकरे हे पुण्यातून तडकाफडकी मुंबईला रवाना झाले.

यावरून पुण्यातील मनसेच्या संघटनात्मक बांधणी आणि नेत्यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. मुंबईत आल्यानंतर याबाबत राज ठाकरे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात आले होते. आठ विधानसभा मतदारसंघांचा राज ठाकरे आढावा घेण्यासाठी आले होते. राज ठाकरे आले तेव्हा पुण्यातील पक्ष कार्यालयात कुणीही उपस्थित नव्हते. राज ठाकरे येणार माहीत असूनही एकही पदाधिकारी न आल्याने राज ठाकरे चांगलेच संतापले. दुपारी अडीच वाजताची बैठक होती. पण उशिरापर्यंतही पदाधिकारी, नेते आले नाहीत. त्यामुळे राज ठाकरे यांचा पारा चांगलाच चढला. त्यानंतर त्यांनी तडकाफडकी मुंबईला येण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी पुण्याहून मुंबईकडे रवाना झाले.

विभागप्रमुख आलेच नाही
राज ठाकरे येणार हे माहीत असतानाही विभागप्रमुख पक्ष कार्यालयात आले नाहीत. इतर नेतेही नव्हते. विभागप्रमुखांना फोनही लावण्यात आले. पण कुणीच वेळेत आले नाही. त्यामुळे राज ठाकरे यांनी अधिकवेळ वाट न पाहता ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले.

संघटनेत गटबाजी
दरम्यान, पुण्यातील मनसेच्या संघटनेत गटबाजी असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. गटबाजीमुळे पुण्यातील मनसे संघटनेत अनेक वाद निर्माण झाले. राज ठाकरे यांच्यापर्यंत या गटबाजीच्या तक्रारी गेल्या. पण त्यावर ठोस असा तोडगा निघालेला नाही. त्यामुळे पक्षातील धुसफूस कायमच राहिल्याचे सांगितले जात आहे.

कारवाई होणार?
दरम्यान, आजच्या प्रकाराने राज ठाकरे प्रचंड संतापले. मुंबईत आल्यावर राज ठाकरे या प्रकरणी संबंधितांकडून खुलासा घेऊन कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे राज ठाकरे याप्रकरणी काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR