तेल अवीव : इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतन्याहू यांच्या पत्नी सारा नेतन्याहू यांनी पोप फ्रान्सिस यांना इस्रायल गाझा युद्धात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. कुठल्याही अटीशिवाय बंधकांच्या सुटकेसंदर्भात पुढाकार घ्यावा अशी विनंती त्यांनी पोप फ्रान्सिस यांना केली आहे.
पोप फ्रान्सिस यांना लिहिलेल्या पत्रात सारा नेतन्याहू यांनी हमासच्या दहशतीचा उल्लेख केला आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी निर्दोष नागरिकांची हत्या केली आहे आणि नवजात मुलांना जाळले आहे, असे सारा यांनी या पत्रात म्हटले आहे. एवढेच नाही, तर या पत्रात त्यांनी महिलांवरील बलात्काराचाही उल्लेख केला आहे. सारा यांनी म्हटले आहे, ज्यू समाजाच्या नरसंहारानंतर (हिटलरच्या काळातील) ही सर्वात मोठी घटना होती. त्यांनी म्हटले आहे अत्याचाराच्या ७८ दिवसांनंतरही हमासने १२९ पुरुषांना, महिलांना आणि मुलांना बंधक बनवून ठेवले आहे. त्यांनीत अनेक जण जमी आणि आजारी आहेत. ते भूकेले आहेत आणि काहींना तर, जीनंत राहण्यासाठी आवश्यक असलेल्या औषधींपासून वंचित ठेवले जात आहे.
या पत्रात सारा यांनी नोआ अरगामेनी नावाच्या एका बंधकाचा उल्लेख केला आहे. हमासच्या हल्लेखोरांनी हिचे ७ ऑक्टोबरला अपहरण केले होते. सारा यांनी म्हटले आहे की, नोआची आई स्टेज ४ च्या ब्रेन कॅन्सरचा सामना करत आहे आणि त्यांना आपल्या मुलीला भेटायचे आहे. आपण (पोप फ्रान्सिस) या प्रकरणात हस्तक्षेप करावा आणि बंधकांच्या सुटकेसाठी आपल्या प्रभावाचा उपयोग करावा अशी इच्छा सारा यांनी आपल्या पत्रातून व्यक्त केली आहे.