41 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रपराभवाच्या भीतीमुळेच काँग्रेस उमेदवारांचा भाजपाकडून छळ

पराभवाच्या भीतीमुळेच काँग्रेस उमेदवारांचा भाजपाकडून छळ

मुंबई : प्रतिनिधी
काँग्रेसच्या रामटेक लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. मात्र रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्यानंतर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, रामटेक लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचे या निवडणुकीत पारडे जड आहे. त्यामुळेच त्यांच्या विरोधात साम-दाम-दंड-भेद सूत्राचा वापर भाजपने सुरू केला आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.

वडेट्टीवार पुढे म्हणाले की, लोकशाहीचा उत्सव समजल्या जाणा-या देशाच्या लोकसभा निवडणुकीत सरकारी यंत्रणांचे निष्पक्ष वागणे अपेक्षित असताना यंत्रणा याविरुद्ध आचरण करत आहे. त्यामुळेच रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र समितीने रद्द केले आहे. लोकशाही मार्गाने, जनतेच्या दरबारात जाऊन निवडणूक लढणा-या रश्मी बर्वे यांच्यावर आज अन्याय झाला आहे, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

ते पुढे म्हणाले की, कायद्यानुसार १७ फेब्रुवारी २०२० रोजी रश्मी बर्वे यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळाले होते, त्यामुळे जात पडताळणी समितीला हे प्रमाणपत्र रद्द करण्याचा अधिकार नाही. समितीने अधिकार कक्षेच्या बाहेर जाऊन हा निकाल दिला आहे, त्यामुळे या समितीवर कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी आहे.

जी समिती जात प्रमाणपत्र देते ती समिती जात वैधता प्रमाणपत्र रद्द करू शकत नाही. जात प्रमाणपत्राबाबत समितीने २० मार्च रोजी नोटीस दिली आणि आठ दिवसांत हे प्रमाणपत्र रद्द केले. नवनीत राणा यांचे जात वैधता प्रमाणपत्र हायकोर्टाने रद्द केले होते, सुप्रीम कोर्टात प्रकरण प्रलंबित राहून पाच वर्षे खासदारकी पदावर राहिल्या, आणि आता भाजपने उमेदवारी दिली. इतके झाले तरी काँग्रेस लढत राहणार, न्यायालयात आम्ही दाद मागणार, असेही वडेट्टीवार यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR