नागपूर : साधूच्या वेशात आलेल्या बंटी-बबलीने वृद्ध दाम्पत्याला पूजेच्या बहाण्याने दागिने आणि रोख दहा हजार रुपये घेऊन गंडा घातला. ही घटना वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या दिघोरी येथील योगेश्वरीनगरात घडली.
साधूराम बळिराम दमाहे (वय ६६) असे वृद्धाचे नाव आहे. ते खासगी काम करतात. साधूराम दमाहे आणि त्यांची पत्नी या दोघांचीही प्रकृती ठीक राहत नाही. त्यांनी अनेक उपचार केले. दरम्यान त्यांच्याकडे भगवे कपडे परिधान केलेला एक पुरुष आणि एक महिला आली. ते दोन दिवस सतत येत असल्याने साधूराम यांच्या पत्नीने त्यांना प्रकृती ठीक राहत नसल्याचे सांगितले.
त्यावरून त्यांनी घरात अनिष्ट शक्तीचे वास्तव्य असल्याने घरात पूजा करावी लागेल असा सल्ला दिला. यावेळी साधूराम यांना नारळ देत, ते शंकराच्या मंदिरात फोडण्यास सांगितले. याशिवाय त्यांच्या पत्नीला पूजेत ठेवण्यासाठी घरातील दागिने आणि पैसे आणण्यास सांगितले. त्यातून त्यांनी घरातील सोन्याचे दागिने व रोख १० हजार रुपये पूजेसाठी दोघांनाही आणून दिले.
त्यांनी साधूराम यांच्या पत्नीला घरातील देवघरात पाठविले आणि ते दागिने आणि पैसे घेऊन पळून गेले. परत येताच दोघेही न दिसल्याने त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, त्यांनी तक्रार दाखल केली.