भोपाळ : मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका होत असून, अवघ्या काही दिवसांवर मतदान आले आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात प्रचाराला वेग आला आहे. सत्ताधारी आणि विरोधकांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील मध्य प्रदेशात प्रचारसभा घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी मध्य प्रदेशात तीन जिल्ह्यांच्या दौ-यावर असून एका रॅलीला संबोधित करताना, काँग्रेसला १०० वर्षे तरी सत्तेपासून दूर ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा देशाच्या प्रगतीला रिव्हर्स गिअर लागेल, अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.
अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम रोखण्यासाठी काँग्रेसने प्रयत्न केले. प्रभू श्रीरामांना काल्पनिक असल्याचे भासवले. काँग्रेस हिंदूविरोधी आहे, या शब्दांत पंतप्रधान मोदींनी निशाणा साधला. तसेच काँग्रेसच्या काळापासून सरकारी योजनांचा लाभ घेणा-या सुमारे १० कोटी बनावट लाभार्थ्यांचा आम्ही शोध घेतला आणि त्यांचे नाव लाभार्थ्यांच्या यादीतून काढून टाकले, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले. पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, १०० वर्षे तरी काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवणे आवश्यक आहे.
अन्यथा काँग्रेस देशाची प्रगती ‘रिव्हर्स गियर’ मध्ये घेऊन जाईल. तुमच्या एका मताने भाजपला मध्य प्रदेशात सरकार स्थापन करण्यास मदत होईल. दिल्लीतील भाजप सरकारला बळ मिळेल आणि राज्यात काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवेल, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले. तसेच रेशन योजनेबाबत बोलताना ते म्हणाले की, केंद्र सरकारने मोफत रेशन योजना पुढील पाच वर्षांसाठी वाढवण्याचा संकल्प केला आहे. आमच्या सरकारने देशातील चार कोटी गरीब लोकांना पक्की घरे दिली आहेत, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.