नवी दिल्ली : काँग्रेसच्या कार्यकारी समितीमध्ये स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुकांची मागणी करत त्यासाठी एक व्यापक राष्ट्रीय आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या बैठकीत पक्षपाती भूमिका घेतल्याचा आरोप करत निवडणूक आयोगावरही टीका करण्यात आली आहे. तसेच हरियाणाप्रमाणेच महाराष्ट्रातील निवड़णुकीतील कामगिरीची चौकशी करण्यासाठी एका अंतर्गत समितीची स्थापना करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
या बैठकीच्या प्रस्तावामध्ये ईव्हीएमच्या मुद्यावर मौन बाळगण्यात आले. हरयाणा आणि महाराष्ट्रात झालेल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यसमितीच्या बैठकीमध्ये काँग्रेसने ईव्हीएम किंवा पुन्हा मतपत्रिकांद्वारे मतदानाच्या मुद्द्यावर अडून न राहण्याचा निर्णय घेतला. त्याऐवजी आपल्या आंदोलनामध्ये संपूर्ण निवडणूक प्रक्रियेविरोधातच आवाज उठवण्याचे निश्चित केले. मात्र काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी निवडणुकीमध्ये मतपत्रिकांद्वारे मतदान घेण्याची मागणी केली होती.
सुमारे साडेचार तास चाललेल्या काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीत निवडणुकांमधील गैरव्यवहाराबाबत पक्ष सर्व स्तरांवर लक्ष केंद्रित करेल असे निश्चित करण्यात आले. महाराष्ट्रातील निवडणुकांच्या निकालांनंतर विरोधी पक्षांकडून ईव्हीएमवर खापर फोडण्यात येत असले तरी हे पराभवासाठी ईव्हीएमला दोष देणे समजुतदारपणा नसल्याचे काँग्रेसच्या एका वर्गाचे म्हणणे आहे.
आरोप सिद्ध करण्यासाठी ठोस पुरावे नाहीत
ईव्हीएमवरील आरोप सिद्ध करण्यासाठी कुठलेही ठोस पुरावे नसल्याने तसे करणे योग्य ठरणार नाही, असा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे पक्षाने व्यापक मुद्यांवर लक्ष केंद्रीत करावे असे निश्चित करण्यात आले. तसेच बैठकीच्या अखेरीस पारित करण्यात आलेल्या ठरावामध्ये इव्हीएमचा कुठलाही उल्लेख करण्यात आलेला नाही.