सोलापूर : तब्बल महिनाभराच्या विश्रांतीनंतर मंगळवारी सोलापुरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यंदा मे महिन्यातच पावसाला सुरुवात झाली. सलग २० दिवस पाऊस पडल्यानंतर पावसाने मोठी विश्रांती घेतली होती.
पेरणी योग्य पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील शेतक-यांनी खरिपाच्या पेरण्या उरकल्या. यामध्ये उडीद, तूर, बाजरी, मका, सोयाबीनच्या पेरण्या झाल्या. पण पावसाने दडी मारल्यामुळे भुईमुगाची पेरणी होऊ शकली नाही. जोरदार वारे व कडाक्याचे ऊन पडू लागल्यामुळे उगवण झालेली पिके माना टाकू लागली. जमिनीतील ओलावा हटल्यामुळे शेतक-यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले होते. मृग, आदरा, पुनर्वसु ही नक्षत्रे कोरडी गेल्यामुळे शेतक-यांच्या तोंडचे पाणी पळाले.
अशात पुन्हा पावसाचे आगमन झाल्याने शेतकरी सुखावला आहे. गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ हवामान असले तरी तापमानात वाढ कायम होती. त्यामुळे लोकांना उकाड्याचा त्रास जाणवत होता. अशात मंगळवारी सायंकाळनंतर ढग भरून आले. जागोजागी पावसाला सुरुवात झाली. कुठे जोरदार तर कुठे हलक्याशा पावसाच्या सरी कोसळल्या. सोलापूर शहरात सायंकाळी सात वाजेच्या सुमारास पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. जिल्ह्यात सर्वदूर पावसाला सुरुवात झाल्याचे वृत्त आहे. पावसाला सुरुवात झाल्यामुळे शेतकरी सुखावला आहे. या पावसाने खरिपांच्या पिकाला जीवदान मिळाले आहे.
















