नाशिक : महायुतीमध्ये नाशिक, धाराशिव, रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि छत्रपती संभाजीनगर या मतदार संघांतील जागांसाठीचा तिढा सुटत नसतानाच एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. ज्यामध्ये नाशिक आणि धाराशिवच्या जागा राष्ट्रवादीकडे राहणार असल्याचे स्पष्ट झाले. नाशिकच्या जागेवर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या छगन भुजबळ यांना उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. ज्यानंतर याच जागेवरून विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी मात्र तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान, महायुतीतील नाशिकचा उमेदवार बदलण्याच्या चर्चांनी जोर धरला. याच चर्चांदरम्यान खासदार हेमंत गोडसे तिस-यांदा मुंबईमध्ये उशिरा रात्री रवाना झाले. मंगळवारी सकाळी ‘वर्षा’ बंगल्यावर जाऊन त्यांनी आपल्या समर्थकांसह मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली. सुरुवातीला भाजपकडून स्वामी शांतिगिरी महाराज तर आता राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ यांचे नाव चर्चेत असल्याने गोडसेंनी नाराजी व्यक्त केल्याचे म्हटले गेले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्यासोबत आल्याचे वक्तव्य ते वारंवार सांगत तिकिट मिळण्याबाबत अस्वस्थ होते. मात्र सातत्याने वेगवेगळ्या माध्यमातून त्यांचे तिकिट कापण्याची चर्चा वाढत असल्याने आज पुन्हा ते उमेदवारी जाहीर करण्याबाबत गळ घालणार आहेत.