जालना : लोकसभेच्या जालना मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. अशाच एका गावातील प्रचारादरम्यान, त्यांनी ‘अरे गड्याहो बिस्किट खा, अन् मला मतदान करा’, असे आवाहन केले. या आवाहनात एक किस्सा दडलेला आहे.
दरम्यान, प्रचाराच्या निमित्ताने दानवे भोकरदन तालुक्यातील अनवा येथून जळगाव सपकाळ गावाकडे जात असताना त्यांना भूक लागली म्हणून बिस्किटचा पुडा आणायला लावला.
गाडीत बसून बिस्किट खातखातच गाव आल्यावर ते पुडा घेऊन गाडीतून खाली उतरले. जळगाव सपकाळ येथे आयोजित बैठकीला आश्रमशाळेच्या पटांगणात पदाधिकारी, कार्यकर्ते त्यांची वाट पाहतच होते. घाईघाईत दानवेंनी माईकचा ताबा घेतला आणि भाषणाला सुरुवात केली. मग रावसाहेब दानवेंनी या दोघा ज्येष्ठ कार्यकर्त्यांकडे आपला मोर्चा वळवला आणि हातात असलेल्या पुड्यातील दोन बिस्किटं काढत दोघांना दिली आणि ती खाण्याचा आग्रह केला. स्वत: दानवेंनी आपल्याला बिस्किट दिले म्हटल्यावर त्यांना आनंद झाला. या आनंदाच्या ओघातच, दादा आमचं यंदाचं शेवटचं मतदान आहे, ते आम्ही तुम्हालाच करणार असं या दोघांनी सांगून टाकलं.
यावर दानवेंना काही सुचले नसेल तर नवलच. मिश्किल टोलेबाजीत हातखंडा असलेल्या दानवेंनी या दोघांना दोन बिस्किट खाऊ घातले, पण आपल्या पुढच्या निवडणुकीच्या मतदानाची हमीही घेतली. गड्याहो पुढच्या मतदानापर्यंत तुम्ही जगशाल, बिस्किट खा !अन् तंदुरुस्त रहा, अशा शब्दांत दोघांना शुभेच्छा आणि पुढच्या निवडणुकीसाठी आपली दोन मतं फिक्स करून टाकली.