मुंबई : यूट्यूबर आणि बिग बॉस ओटीटी विजेता एल्विश यादवसह सहा जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एका रेव्ह पार्टीत सापाचे विष नशेसाठी पुरवल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. त्याने या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले असून उत्तर प्रदेश पोलिसांना तपासात सहकार्य करणार असल्याचे सांगितले आहे. मात्र, या प्रकरणावरून महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले आहे. काँग्रेसने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर या प्रकरणावरून हल्लाबोल केला आहे. गणपतीत उत्सवाच्या दरम्यान एल्विश यादव एकनाथ शिंदेंच्या वर्षा बंगल्यावर आला होता. त्याने गणपतीची आरतीही केली होती. मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर नशेबाजांचा पाहुणचार केला जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर एल्विश यादव सारख्या विषारी नशाबाजांचा सुळसुळाट झाला आहे. शाल नारळ देऊन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आदरतिथ्य करण्यात आले. शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर बोलावून आदरतिथ्य केले गेले. त्याच्यावर सापाच्या विषापासून ड्रग्ज बनवणे, सेवन करणे आणि विकणे यासारखा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलांबाबत अपशब्द वापरणारा, विषारी ड्रग्स चे सेवन विक्री करणाऱ्या आरोपीचे आदरतिथ्य करून मुख्यमंत्री एल्विश यादव सारख्या नशाबाज तरुणांना राज्यातील तरुणांचे रोल मॉडेल बनवण्यात हातभार लावत आहे का? आधीच राज्यात ड्रग कारखाने सापडत आहेत आणि इथे वर्षावर नशाबाज आरती करतो, असे ते म्हणाले. तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान गुन्हेगारांसाठी पर्यटनस्थळ झाले आहे का? असा सवाल काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे