नवी दिल्ली : वृत्तसंस्था
हुथी बंडखोरांनी आज सकाळी अचानक तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला केला. या हल्ल्यात जीवित हानी झालेली नाही. पण या हल्ल्यामुळे जगभरात खळबळ उडाली. तेल अवीव येथे क्षेपणास्त्राचा हल्ला झाल्यामुळे तेल अवीवला जाणारे एअर इंडियाचे विमान हवेत असतानाच वैमानिकांना मार्ग बदलण्याचा सल्ला दिला. त्यावेळी एअर इंडियाचे हे विमान आपत्कालीन परिस्थिती पाहून अबुधाबीच्या विमानतळावर लँड करण्यात आले.
दरम्यान, बंडखोरांच्या हल्ल्याने तेल अवीवला जाणारी एअर इंडियाची उड्डाणे दोन दिवस रद्द केली आहेत. एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार हे विमान आता दिल्लीला परत येणार आहे. हल्ल्यामुळे विमान कंपन्यांनी तेल अवीवला जाणा-या विमानांची सेवा तात्पुरती स्थगित केली. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आला. एअर इंडियाचे एआय १३९ विमान दिल्लीहून तेल अवीवला निघाले होते. पण तेल अवीवच्या बेन गुरियन विमानतळावर हल्ला झाला. त्यामुळे हे विमान अबूधाबीला वळवण्यात आले. एअर इंडियाने ६ मेपर्यंत तेल अवीवला जाणारी आणि तेथून येणारी सर्व विमाने रद्द केली आहेत.