23.8 C
Latur
Monday, February 3, 2025
Homeराष्ट्रीयमहाराष्ट्रात ७० लाख मतदार वाढले कसे?

महाराष्ट्रात ७० लाख मतदार वाढले कसे?

राहुल गांधी आक्रमक, इलेक्टोरल रोलवरील डेटा विरोधकांना द्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी आज लोकसभेत केलेल्या भाषणात पुन्हा एकदा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावर प्रश्न उपस्थित केला. गेल्या वर्षी झालेल्या या निवडणुकीदरम्यान मतदार याद्यांत विसंगती आढळल्याचा आरोप करीत ऐनवेळी ७० लाख मतदार वाढले कसे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणी निवडणूक आयोगाने इलेक्टोरल रोलवरील डेटा विरोधकांच्या महाविकास आघाडीला विश्लेषणासाठी द्यावा, अशी मागणीही राहुल गांधी यांनी केली.

लोकसभेतील राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावासंबंधी चर्चेत बोलताना राहुल गांधी यांनी आरोप केला की, लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर फक्त पाचच महिन्यानंतर नोव्हेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रातील मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नावे जोडण्यात आली. मला महाराष्ट्र निवडणुकीबद्दल बोलायचे आहे. हिमाचल प्रदेशची संपूर्ण लोकसंख्या महाराष्ट्राच्या मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात ७० लाख नवे मतदार अचानक तयार झाले.

निवडणूक आयोगाने मतदार यादी संबंधित डेटा काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांना विश्लेषणासाठी दिला पाहिजे, असेही राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी यांच्या या आरोपांवर निवडणूक आयोगाने कोणतेही उत्तर दिलेले नाही. पण यापूर्वी निवडणूक आयोगाने मतदार यादीत मोठ्या प्रमाणात मतदार वाढल्याची किंवा कमी झाल्याची शक्यता नाकारली होती.

खा. शिंदे यांनी फेटाळला आरोप
शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी राहुल गांधी यांचे आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटले आहे. निवडणूक आयोगाने त्यांच्या वेबसाईटवर प्रत्येक मतदार यादी अपलोड केलेली आहे, असेही शिंदे म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR