दुर्गापूर : पश्चिम बंगालच्या दुर्गापूर येथे एमबीबीएसचे शिक्षण घेणा-या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. खासगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात झालेल्या या घटनेवर राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मौन सोडले आहे. मात्र यावेळी त्यांनी केलेल्या वक्तव्यावर सर्व स्तरातून टीका केली जात आहे.
मुलींना रात्री बाहेर पडण्याची परवानगी नसली पाहिजे असे ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत. तसेच त्यांच्या सरकारला या प्रकरणात ओढणे अन्यायकारक आहे, कारण पीडितेच्या सुरक्षेची काळजी घेण्याची जबाबदारी ही खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाची होती, असेही त्या म्हणाल्या आहेत.
ममता बॅनर्जी यांनी पीडिता मध्यरात्रीच्या सुमारास कॉलेज कॅम्पसच्या बाहेर गेल्यावरून प्रश्न उपस्थित केला आहे. तिच्या सुरक्षेची जबाबदारी खासगी वैद्यकीय महाविद्यालायाची असल्याचे त्यांनी यावेळी सूचित केले. ममता बॅनर्जी म्हणाल्या ती मुलगी खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात शिकत होती. सर्व खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात ही कोणाची जबाबदारी आहे? ती रात्री साडेबारा वाजता बाहेर कशी गेली? जेवढं मला माहिती आहे.
त्यानुसार ही घटना (बलात्कार) जंगलात घडली. साडेबारा वाजता काय घडलं, मला माहिती नाही, त्याचा तपास सुरू आहे. घटना पाहून मला धक्का बसला आहे, पण खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनीही देखील त्यांच्या विद्यार्थ्यांची काळजी घेणे आवश्यक आहे, विशेषत: रात्रीच्या वेळी मुलींना बाहेर येण्याची परवानगी नसली पाहिजे. त्यांनी स्वत:चेही संरक्षण करायला हवे, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत.
ममता बॅनर्जींनी त्यांच्या सरकारवरच टीका केली जात असल्याबद्दलही प्रश्न उपस्थित केला. सुमारे एक महिन्यापूर्वी ओडिशामधील पुरी बीचवर एका विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कारझाल्याच्या घटनेचा उल्लेख करत, ओडिशा सरकार काय कारवाई करत आहे? असा प्रश्न विचारला.
नेमके काय झाले?
कोलकात्यापासून सुमारे १७० किमी अंतरावर, दुर्गापूरच्या शोभपूरजवळील एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या दुस-या वर्षात शिकणा-या विद्यार्थिनीवर लैंगिक आत्याचार करण्यात आला. ही पीडित तरुणी ओडिशामधील रहिवासी असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री ती तिच्या मित्रासह कॉलेजच्या संकुलाच्या बाहेर आली होती. तेव्हा तिला काही जणांनी संकुलाच्या मागे असलेल्या जंगलात ओढत नेले आणि लैंगिक अत्याचार केला. पोलिसांना याची माहिती प्राप्त झाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पीडितेला रुग्णालयात दाखल केले. पीडितेला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.