नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर पक्ष आणि चिन्हाची लढाई सुरु झाली. याबाबत निवडणूक आयोगात सध्या सुनावणी सुरु आहे. या सुनावणीसाठी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे, आ. जितेंद्र आव्हाड यांच्यासह खुद्द शरद पवार निवडणूक आयोगात उपस्थित होते. यावेळी शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी राष्ट्रवादी पक्षाची स्थापना शरद पवारांनी केली, मग त्यांच्याशिवाय पक्ष कसा काय असू शकतो, असा सवाल उपस्थित केला. यावर आता उद्या दुपारी सुनावणी होणार आहे.
यावेळी प्रतिज्ञापत्राच्या सत्यतेबद्दलही युक्तिवाद करण्यात आला. अजित पवार गटाकडून वकिल मुकुल रोहोतागी हे युक्तिवाद केला. ते म्हणाले की, अजित पवार गटाचे एकही प्रतिज्ञापत्र बनावट नाही. यावेळी अजित पवार गटाचे सुनील तटकरे, पार्थ पवार उपस्थित होते. शरद पवार गटाकडून वकिल देवदत्त कामत आणि अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केला. दरम्यान सुप्रिया सुळे यांच्या कार्याध्यक्षपदाची नियुक्ती चुकीची असल्याचा युक्तिवाद अजित पवार गटाकडून करण्यात आला.
दरम्यान, शरद पवार गटाचे वकिल देवदत्त कामत यांनी युक्तिवादाला सुरुवात केली. तसेच अभिषेक मनु सिंघवी यांनी राज्यस्तरावरील २८ पैकी २० पदाधिकारी हे शरद पवार यांच्यासोबत आहेत. नॅशनल वर्किंग कमिटीमधील ८६ पैकी ७० सदस्य हे शरद पवार यांच्यासोबत आहेत. आम्ही आयोगात सादर केलेल्या सर्व पदाधिका-यांचे प्रतिज्ञापत्र खरे आहे, असे म्हटले.