27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यात हुडहुडी!

राज्यात हुडहुडी!

- पुढील तीन दिवस गारठा वाढणार - उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात तापमानात घट

पुणे : उत्तर भारतात थंडीची लाट पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातही आता गारठा वाढू लागला असून अजूनही थंडी सुरू होण्याची प्रतीक्षा कायम आहे. उत्तरेकडून येणारे थंड वारे राज्यातील थंडीसाठी पोषक ठरणार आहेत. मध्य आणि पूर्व भारतात येत्या ४८ तासांत तापमानात घट होणार आहे. पुढील दोन दिवसांत देशातील मध्य आणि पूर्व भागात तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

मकर संक्रांतीनंतर राज्यात हुडहुडी पाहायला मिळत आहे. पुढील तीन दिवस राज्यातील गारठा वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यासह देशातील तापमानात गेल्या काही आठवड्यांमध्ये मोठा बदल पाहायला मिळाला होता. वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे देशात कुठे पाऊस तर कुठे थंडी असे चित्र पाहायला मिळत होते. येत्या काही दिवसांत राज्यातील थंडीला सुरुवात होणार असल्याचे आयएमडीने म्हटले आहे. उत्तर महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा, पश्चिम विदर्भात तापमान घसरण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

आजही देशासह राज्यात तापमानाचा पारा घसरला आहे. आयएमडीच्या माहितीनुसार, बुधवारी राज्याच्या किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. उत्तर भारतात सध्या थंडीची लाट पाहायला मिळत आहे. उत्तरेकडून मैदानी प्रदेशात पोहोचणा-या थंड वा-यांचा परिणाम राज्याच्या हवामानावरही होताना दिसत आहे. परिणामी राज्याच्या तापमानात पुढील काही दिवसांत घट होणार असल्याचा अंदाज आयएमडीने व्यक्त केला आहे.

राज्यात पुढील तीन दिवस गारठा वाढणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. उत्तर महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तापमान १० अंशाखाली राहण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. आज देखील राज्याच्या अनेक भागात किमान तापमान १० अंशाखाली पोहोचल्याचे पाहायला मिळाले. बुधवारी किमान तापमानात आणखी घट नोंदवली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मंगळवारी जळगावमध्ये ९.४, अहमदनगर ९.६, नाशिक ९.८, संभाजीनगर ९.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

पुण्यातील किमान तापमान १०.८ अंशांवर
उद्या पुण्यातील किमान तापमान १० अंशांखाली राहण्याची शक्यता आहे. त्याशिवाय यवतमाळमध्ये ११.५ अंश सेल्सिअस तर अकोल्यात तापमानाचा पारा १२.३ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR