31.8 C
Latur
Thursday, July 4, 2024
Homeमहाराष्ट्रबलिदान देणा-या पाच जणांच्या चरणी माझे यश अर्पण

बलिदान देणा-या पाच जणांच्या चरणी माझे यश अर्पण

विधान परिषदेचा अर्ज भरण्यापूर्वी पंकजा मुंडे भावूक

मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीसाठी भाजपने पाच उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये काही हजारांच्या मताने लोकसभेत पराभूत झालेल्या पंकजा मुंडेंसह आणखी तीन ओबीसी नेत्यांना भाजपने संधी दिली आहे. पंकजा मुंडे यांचे नाव काल जाहीर करण्यात आले. विधानपरिषदेत संधी मिळाल्याने मुंडे समर्थक आणि कार्यकर्त्यांकडून मोठा उत्साह आणि जल्लोष साजरा करण्यात येत आहे.

आज अर्ज भरण्याची शेवटची तारीख असून आज पंकजा मुंडे आपला उमेदवारीचा अर्ज भरणार आहेत. त्याआधी पंकजा मुंडेंनी मुंबईतील श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी विधानभवनाच्या परिसरात माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्या भावूक झाल्याचे दिसून आले. यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी त्यांचा पराभव जिव्हारी लावून घेत टोकाचे पाऊल उचलेल्या त्यांच्या कार्यकर्त्यांच्या आठवणीत त्या भावूक झाल्या.

पंकजा मुंडे बोलताना म्हणाल्या की, मी आजच्या दिवसाची सकारात्मक सुरुवात करत आहे. चांगल्या वाईट काळात मला संधी दिली आहे. जेपी नड्डा, अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनुकळे, या सर्वांचे मी आभार मानते. मला प्रतीक्षा करावी लागली, पण आज लोकांना हवे ते झाले आहे. मला आज जे काही मिळत आहे ते पाच जीवांच्या चरणी मी अर्पण करते. आज ते इकडे असते तर घोषणा दिल्या असत्या असे म्हणत पंकजा मुंडे विधान परिषदेचा अर्ज भरण्यापूर्वी भावूक झाल्या.

विधानपरिषदेसाठी भाजपकडून पाच नावांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये पंकजा मुंडे यांची देखील विधान परिषदेवर वर्णी लागली असून यासोबत सदाभाऊ खोत, अमित गोरखे, परिणय फुके, योगेश टिळेकर यांच्या नावाचा देखील यामध्ये समावेश आहे. या निवडणुकीत भाजपकडून पाच, शिवसेनेच्या शिंदे गटाकडून दोन आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून दोन उमेदवार दिले जातील असे सांगितले जात आहे. महाविकास आघाडीकडून दोन उमेदवार दिले जातील असे सांगितले जात आहे. पण महाविकास आघाडीने जर तिसरा उमेदवार दिला तर भाजपकडून एक अपक्ष उमेदवार दिला जाईल असे सांगितले जात आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR