मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात फार जुनी मैत्री आहे. दोघंही वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नेते असले तरी राजकारणापलीकडे त्यांची मैत्री होती. पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या मैत्रीत काहीसा दुरावा निर्माण झाला आहे. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी एकनाथ शिंदेंबरोबरच्या मैत्रीवर भाष्य केले आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर मला आनंदच झाला, असे मोठे वक्तव्य आव्हाडांनी केले आहे.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने तुम्हाला आनंद झाला की तुमच्यासाठी तो राजकीय धक्का होता? असा सवाल विचारला असता जितेंद्र आव्हाड म्हणाले, ‘‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने मला आनंदच झाला. कारण तोपर्यंत माझे आणि त्यांचे संबंध चांगले होते. १९९७-९८ पासून माझे एकनाथ शिंदेंशी मैत्रीपूर्ण संबंध होते. आमची मैत्री उघडपणाने नव्हती. आम्ही पैशांच्या देवाणघेवाणीत नव्हतो. पण कधी एकमेकांना काही मदत लागली तर आम्ही जरूर मदत करायचो.’’
‘‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा मी म्हटलं होतं, ‘चला, आता हक्काचा माणूस आला. त्यांच्या दारात जाऊन निधी मागू शकतो.’ तेव्हा माझ्या पक्षातील काही लोकांनी मला म्हटलं की, तू त्यांच्या दारात जाऊन निधी मागू, असं का म्हणालास? पण त्यात काय झालं. मतदारसंघासाठी कुणाच्या दारात जावं लागलं, तर हरकत आहे. आता हे (अजित पवार गट) विकासासाठी मोदींच्या दारात गेलेच ना.. त्यामुळे आम्ही एकनाथ शिंदेंच्या दारात गेलो, तर काय फरक पडतो. शेवटी मतदारसंघाच्या विकासासाठीच तर आपण आमदार असतो ना..’’ असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.