27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रराजीनामा दिल्यास मागे घेण्याची माझ्यात कुवत

राजीनामा दिल्यास मागे घेण्याची माझ्यात कुवत

पुणे : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या टीकेला आज शरद पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर देत पलटवार केला. पक्षाचा अध्यक्ष या नात्याने माझी भूमिका स्पष्ट होती. भाजपसोबत जायचे नाही, असे ठरले होते. माझ्यासह अनेकांची भूमिका तीच होती. मात्र, अजित पवार यांची भूमिका आमच्याशी सुसंगत नव्हती. जनतेने भाजपविरोधात कौल दिलेला असताना त्यांनी घेतलेली भूमिका जनतेची फसवणूक करणारी आहे, अशा शब्दांत शरद पवार यांनी हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी पक्षाचा अध्यक्ष म्हणून निर्णय घेण्यास सक्षम आहे. राजीनामा दिला तर मागे घेण्यास माझ्यात कुवत आहे, त्यासाठी परांजपे, आव्हाडांना विचारायची गरज नाही, असा टोला त्यांनी लगावला.

पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड आदी उपस्थित होते. याप्रसंगी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेले सर्व आरोप खोडून काढले. विधानसभेत आम्ही जी मते मागितली, त्यावेळी भाजपच्या विरोधात आमची भूमिका होती. त्यामुळे भाजपसोबत गेलो असतो, तर जनतेची दिशाभूल झाली असती. त्यांचे विचार जाहीरनाम्याशी विसंगत आहेत. त्यामुळे भाजपसोबत न जाण्याची भूमिका माझ्यासह अनेकांची होती.

मुळात पक्षाचा अध्यक्ष या नात्याने माझी भूमिका स्पष्ट होती. पक्षाचा अध्यक्ष असल्याने माझ्या राजीनाम्याचा निर्णय सामूहिक होता. मुळात निर्णय घेण्यासाठी मी सक्षम आहे. कोण्या नेत्याला विचारून मी निर्णय घेण्याचा प्रश्नच नाही. मी राजीनामा दिला, म्हणून परत अध्यक्ष होण्यासाठी मला परांजपे किंवा आव्हाड यांची परवानगी घ्यायची गरज नाही. निर्णय घेण्याची माझी कुवत आहे, असेही ते म्हणाले.

मुळात लोकांच्या समोर जायचे असेल तर लोक जी भूमिका घेतील, ती मान्य करावी लागेल. काहीही स्टेटमेंट केले तर त्याचा स्वीकार मी का करायचा, त्यांनी राजकीय निर्णय घेतला तो त्यांचा अधिकार आहे, फक्त त्यांनी राष्ट्रवादीच्या नावावर मत मागितले. त्याच्याशी विसंगत त्यांनी भूमिका घेतली. ही भूमिका निवडणुकीआधी घ्यायला हवी होती, असा आरोप शरद पवार यांनी केला.

पटेल यांनी ईडीच्या कारवाईवर पुस्तक लिहावे
खा. प्रफुल्ल पटेल यांनी आपण लवकरच पुस्तक लिहून गौप्यस्फोट करणार असल्याचे म्हटले होते. त्यावर शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यासडे पुस्तक लिहिण्यासाठी अनेक मुद्दे आहेत. त्यांनी लोक पक्ष सोडून का जातात, यावर पुस्तक लिहावे. तसेच ईडीच्या कारवाईवरही त्यांनी पुस्तक लिहावे, असा चिमटा काढला.

राजीनामा देतो म्हणालोच नाही
पक्षाचा मी अध्यक्ष होतो. प्रत्येकाला माझ्याशी सुसंवाद साधण्याचा पूर्ण अधिकार होता. त्यांनी ज्या मागण्या केल्या, त्याबाबत चर्चा झाली नाही, असे मी म्हणत नाही. चर्चा झाली होती. आमच्यात वेगवेगळ््या चर्चा झाल्या. पण राजीनामा देतो, अशी चर्चा झाली नव्हती, असे शरद पवार म्हणाले.

ब-याच गोष्टी मला पहिल्यांदा कळाल्या
मुळात सत्य काय आहे, हे महत्त्वाचे आहे. अजित पवार खोटे बोलत आहेत. काही गोष्टी मला पहिल्यांदाच कळाल्या आहेत. लोक निर्णय घेतील, तो स्वीकारायचा असतो. कोणी काही स्टेटमेंट करेल, ते मी का स्वीकारावे, कोणी काय भूमिका घ्यावी हा त्यांचा अधिकार आहे. पण हा निर्णय निवडणुकीच्या आधी घ्यायचा होता, असा निशाणा पवारांनी साधला.

युवकांना बळ देणार
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आज युवक कॉंग्रेसची पुण्यात बैठक झाली. यावेळी बोलताना त्यांनी युवा नेत्यांना बळ देऊ शकलो, तर आगामी निवडणुकीत तुम्हाला मोठे यश मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. पक्ष सोडून गेलेल्यांची काळजी करण्याची गरज नाही. त्यांची काळजी करण्यापेक्षा आपण नागरिकांचे प्रश्न हाती घेऊन ते सोडवले पाहिजेत, असा विश्वास व्यक्त केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR