मुंबई : लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सदस्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावर सविस्तर चर्चा केली. यावरून राजकीय वर्तुळातही दावे-प्रतिदावे केले असून शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गो-हे यांनी या विधेयकावर उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेवर प्रतिक्रिया देताना टोलेबाजी केली.
वक्फ बोर्ड विधेयकात काही चांगल्या सुधारणा आहेत. अफरातफरीला पायबंद बसून पारदर्शकता आली पाहिजे. पण, काही गोष्टी भाजप उकरून काढत आहे. फटाक्याची वात पेटवून पळून जायचे. ते फुटून झाले की मिरवायला यायचे, ही भाजपची वाईट सवय आहे. आम्हीच सगळे काही केले या वृत्तीचा आम्ही विरोध केला आहे. विधेयकाला विरोध करण्यापेक्षा भाजपच्या ढोंगाला आणि जमिनी बळकावून त्यांच्या व्यापारी मित्रांना काही देणार आहे. त्या भ्रष्टाचाराला विरोध केला आहे असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. यावरून भाजपसह महायुतीतील नेते ठाकरे गटावर तिखट शब्दांत हल्लाबोल करत आहेत. यातच शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गो-हे यांनीही यावर बोलताना ठाकरे गटाला टोला लगावला आहे.
नीलम गो-हे म्हणाल्या की, वक्फ विधेयकावर मी बोलेल. परंतु, त्यांच्यावर मी बोलणार नाही. मी बोलले की, त्यांच्या खूप जिव्हारी लागते, असे म्हणत त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. १९८४ ला शाह बानो प्रकरणात पोटगीचा अधिकार नाकारला. तेव्हा त्या महिलेला वक्फ बोर्डाच्या माध्यमातून पोटगी देण्यात येईल, असे न्यायालयाने म्हटले होते. तेव्हा पहिल्यांदा वक्फ शब्द आला होता. परंतु, माझ्या माहितीप्रमाणे वक्फ बोर्डाने असे कोणतेही पैसे दिले नाहीत, असा दाखला देत नीलम गो-हे यांनी वक्फ विधेयकाचे समर्थन केले आहे.
दरम्यान, वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावरून देशभरात सगळीकडे चर्चा सुरू आहे. त्यातच हे विधेयक संसदेच्या सभागृहात मंजूर करताना झालेल्या मतदानावेळी शरद पवार आणि त्यांच्या पक्षाच्या २ खासदारांच्या अनुपस्थितीने सगळ्यांचे लक्ष वेधले. लोकसभेत शरद पवारांच्या पक्षाचे २ आणि राज्यसभेत स्वत: शरद पवार मतदानावेळी गैरहजर होते. इतके महत्त्वाचे विधेयक पारित होताना शरद पवारांनी गैरहजेरीने त्यांच्या भूमिकेबद्दल साशंकता निर्माण झाली आहे.