बीड : फडणवीस साहेबांनी फक्त सगेसोय-यांची मागणी मान्य करावी आणि मराठ्यांना आरक्षण द्यावे, मी त्यापुढे राजकारणावर एक शब्दही बोलणार नाही असे मनोज जरांगे यांनी म्हटले. फडणवीसांनी आपल्याविरोधात मराठा आमदार उभे केलेत, त्यांनी जर आरक्षण दिले नाही तर त्यांना राजकारणात लोळवल्याशिवाय मराठा समाज मागे हटणार नाही असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला. बीडमध्ये झालेल्या घोंगडी बैठकीमध्ये मनोज जरांगे यांनी हे वक्तव्य केलं.
देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना मनोज जरांगे म्हणाले की, तुम्हाला गरिबांची मुले मोठी व्हावेत असे का वाटत नाही? या सरकारमधील मंत्र्यांना गरिबांची पोरं मोठी होऊ नयेत असं का वाटते? तुम्हाला फक्त तुमचा पक्ष आणि नेते मोठे करायचे आहेत. देवेंद्र फडणवीस, मराठ्याच्या मुलांनी तुमचे काय वाकडे केले? मराठ्यांचे आमदार मराठ्यांच्या विरोधात उभे केले. कुठे केसेस करत आहे, कुठे मराठ्यांचे आमदार विरोधात उभे करता. फडणवीस साहेब तुम्हाला लोळवल्याशिवाय आता मराठा समाज मागे हटत नाही. जर तुम्ही आरक्षण दिले नाही तर आम्हाला सत्ता काबीज करावी लागणार. मराठा समाज्याच्या आरक्षणासाठी वाटेल ते करेन.
गावागावात घोंगडी बैठक होणार
गावागावात घोंगडी बैठकीचे नियोजन करा असं सांगत मनोज जरांगे म्हणाले की, हे तीन महिने मराठ्यांचे अस्मितेचे आहेत भविष्याचे आहेत. लढाई माणूस केवळ बेसावध राहिल्यामुळे हरतो. उद्यापासून गावागावात २० पोरांची टीम तयार करा. ज्या गावात अशा टीम तयार होतील त्याच गावात घोंगडी बैठका होतील. गरीब मराठा सगळा बाजूला गेला. श्रीमंत मराठ्याला गरीब मराठा जमत नाही. आचारसंहिता लागण्यापूर्वी आठ दिवस आधी आपण बैठक घेवू आणि मग ठरवू की आपण निवडणूक लढवायची का नाही.
लाठीचार्ज केलेल्या अधिका-यास बढती दिली
जातीयवादी आधिका-यांनी अंतरवाली सराटीमध्ये लेकरा-बायांना मारले. ज्यांनी मराठ्यांना मारले त्यांना तुम्ही बढती दिली हे समाज विसरणार नाही. समुद्रसारखी काँग्रेस गेली, तुम्ही गर्वात राहू नका. पोलीस लाठीचार्ज करतात, हल्ले करतात. हा जीवघेणा हल्ला फडणवीसांनी जाणून बुजून करवून आणला असा आरोप मनोज जरांगे यांनी केला.