लातूर : प्रतिनिधी
राज्यातील विद्यमान सत्ताधा-यांना पुन्हा सत्तेत यायचे असेल तर त्यांनी मराठा आरक्षणासाठी केंद्र शासनावर दबाव टाकावा, आरक्षण मिळवून द्यावे, अन्यथा राज्यात निवडणुकाच होणार नाहीत आणि राज्यात शांतताही कायम राहणार नाही, असा इशारा मराठा मावळा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माणिकराव शिंदे यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदे दिला. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने राज्य शासनाने मराठा समाजाची दिशाभूल करु नये, असे नमुद करुन माणिकराव शिंदे म्हणाले, राज्य शासन मराठा समाजाला आरक्षण देणारच, असे सांगत आहे. परंतू, त्यासाठी आवश्यक हालचाल मात्र दिसून येत नाही. मराठा समाजाला टिकणारे आरक्षण हवे आहे. त्यासाठी लोकसभेत मराठा आरक्षणाचा ठराव होणे महत्वपूर्ण आहे. हा ठराव घेण्यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनावर दबाव टाकावा. अन्यथा महाराष्ट्रात निवडणुकाच होणार नाहीत. शांतताही कायम राहिले, असे सांगता येणार नाही.
मनोज जरांगे पाटील आणि आम्ही एकच आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये भेट घेऊन आरक्षणाच्या मागणीचे निवेदन देऊन चर्चा केली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी भावनिक वक्तव्य केले होते, असे नमुद केले. राज्य शासनाने अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारावे, राज्यातील साखर कारखान्यांनी शेतक-यांच्या मुलांसाठी वसतीगृह बांधावेत, शिकवणी चालकांनी गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिकवणी द्यावी, इतर विद्यार्थ्यांची फिस तीन टप्प्यांत घ्यावी, आदी मागण्या संघटनेकडून लावून धरल्या जाणार असल्याचे ते म्हणाले. या पत्रकार परिषद प्रसंगी मराठा मावळा संघटनेचे मराठवाडा कार्याध्यक्ष नंदकिशोर साळुंके, जिल्हा प्रभारी विजय कदम, जिल्हा संपर्क प्रमुख रामभाऊ पवार, जिल्हाध्यक्ष प्रशांत सुरवसे, कृष्णा सरवदे, आशिष मोरे, विश्वा गिरी, मंथन मस्के, कृष्णा सोळुंके आदी मान्यवरांची उपस्थिती होती.