नगर : अहंकार असलेल्यांना जागेवर आणण्याचे काम नगरमधील जनतेने लोकसभा निवडणुकीत केले. दहशतीचे आणि जिरवाजिरवीचे राजकारण फार काळ चालणार नसल्याचा हा संदेशच आहे. त्याचा आता तरी अभ्यास करावा, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे यांना नाव न घेता सुनावले.
काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी आश्वी आणि परिसराची कौतुक करताना दहशत आणि दडपशाही असताना देखील गेली २५ वर्षे सातत्याने मोठे मताधिक्य दिले.
यामुळे आपणही विकास कामांमध्ये कधीही भेदभाव केला नाही. विरोधकांची देखील कामे केली. गेल्या अडीच वर्षाच्या काळात या परिसरातील पाणीपुरवठा योजना मंजूर करून घेतल्या.
सर्वांना बरोबर घेऊन प्रेमाचे आणि विकासाचे राजकारण केले. मात्र या परिसरामध्ये काहींची मोठी दहशत आहे. विरोधी गावाचा सरपंच असेल, तर अगदी पिण्याच्या पाण्यापर्यंत राजकारणाचे विष या लोकांनी नेऊन ठेवले आहे, असा टोला थोरात यांनी लगावला.
भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे यांचे नाव न घेता बाळासाहेब थोरात यांनी जिरवाजिरवीचे आणि दमदाटीचे राजकारण फार काळ चालत नसते, असे सुनावले.