26.6 C
Latur
Wednesday, March 4, 2026
Homeराष्ट्रीयआयएमएफचे मानांकन चुकीचे

आयएमएफचे मानांकन चुकीचे

भारताला कमी लेखणा-या आयएमएफला अश्विनी वैष्णव यांनी ठणकावले कोणत्या निकषांवर त्यांनी मानांकन नोंदविले?

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी आयएमएफने एआय तंत्रज्ञानाच्या संरचना व आवश्यक पायाभूत सुविधा याबाबतीत भारताची क्रमवारी दुस-या गटात केली. आयएमएफने यासंदर्भात जाहीर निवेदन केल्यानंतर त्यावर मोठी चर्चा पाहायला मिळाली. मात्र, आता एआयच्या बाबतीत भारताला कमी लेखणा-या आयएमएफ अर्थात इंटरनॅशनल मॉनेटरी फंड संघटनेला उत्तर दिले आहे. दावोसमधील वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या पार्श्वभूमीवर झालेल्या एका जाहीर संवाद कार्यक्रमात बोलताना केंद्रीय माहिती व तंत्रत्रान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या क्रमवारीसंदर्भात ठाम भूमिका मांडली आहे. तसेच, आयएमएफचे मानांकन चुकीचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

अश्विनी वैष्णव यांनी आयएमएफच्या मानांकनाचा समाचार घेताना एआयच्या बाबतीत भारत दुस-या नव्हे, तर पहिल्या गटात आहे, असं स्पष्ट विधान केले. यासाठी जागतिक दर्जाच्या मानकांचाही वैष्णव यांनी यावेळी दाखला दिला. आयएमएफच्या निकषांवरदेखील वैष्णव यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

मला माहिती नाही कोणत्या निकषांवर आयएमएफने हे मानांकन दिले आहे. पण स्टॅनफोर्डने जगभरात एआयसंदर्भातील तयारीबाबत भारताला तिसरा क्रमांक दिला आहे. मला वाटत नाही की आयएमएफची वर्गवारी बरोबर आहे. त्यामुळे भारताकडे पहिल्या वर्गातील देश म्हणूनच पाहिलं जायला हवे असे अश्विनी वैष्णव म्हणाले.

भारतातील एआय व्यवस्थेचे ५ स्तर
यावेळी अश्विनी वैष्णव यांनी भारतातील एआय व्यवस्थेचे पाच स्तर असल्याचे नमूद केले. त्यानुसार अ‍ॅप्लिकेशन, मॉडेल, चिप, इन्फ्रास्ट्रक्चर आणि एनर्जी असे ते स्तर असल्याचं वैष्णव म्हणाले. भारत या सर्व स्तरांवर एकाचवेळी काम करत असून त्यात चांगली कामगिरीदेखील करत आहे असेही त्यांनी नमूद केले.

भारतात पुढील महिन्यात एआय समिट
पुढच्याच महिन्यात भारतात नवी दिल्ली येथे एआय समिट पार पडणार आहे. या समिटमध्ये भारतातील एआय व्यवस्थेबाबत, जबाबदार वापराबाबत आणि सर्वसमावेशक धोरणाबाबत भारताकडून स्पष्ट भूमिका मांडली जाण्याची शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR