छत्रपती संभाजीनगर :
छ. संभाजीनगर : एमआयएमचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार तथा प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील हे या वेळी मुंबईमधून लोकसभा निवडणूक लढवणार, अशा वावड्या मध्यंतरीच्या काळात उठवल्या गेल्या होत्या. विशेष म्हणजे स्वत: इम्तियाज यांनीच हे सांगितले होते. अखेर इम्तियाज जलील हे दुस-यांदा छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) २०२४ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत.
एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी काल हैदराबादेत स्वत:सह इम्तियाज जलील यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत एमआयएम-वंचित बहुजन आघाडीचे इम्तियाज जलील यांचा या मतदारसंघातून अनपेक्षित विजय झाला होता. दलित-मुस्लिमांच्या एकगठ्ठा मतांचा पाऊस आणि शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांच्या हक्काच्या हिंदू मतांमध्ये मोठ्या प्रमाणात पडलेली फूट इम्तियाज यांच्या पथ्यावर पडली होती.
गेल्यावेळी सोबत असलेली वंचित आघाडी आता एमआयएमचा मित्रपक्ष राहिलेली नाही, त्यामुळे एमआयएमच्या अडचणी वाढल्या आहेत. तरीही महायुती-महाविकास आघाडीतील थेट लढत आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा तगडा अपक्ष उमेदवार उभा राहण्याची शक्यता गृहीत धरून एमआयएमने पुन्हा नशिब आजमावण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय संभाजीनगरची जागा एमआयएमने जिंकलेली असल्यामुळे साहजिकच त्यांनी ती लढवणे क्रमप्राप्त ठरते.
इम्तियाज जलील यांनी आपल्या पाच वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत सत्ताधारी व इतर विरोधकांच्या विरोधात रान पेटवत लक्ष वेधले आहे. संसदेत सर्वाधिक प्रश्न विचारणा-या खासदारांमध्ये इम्तियाज जलील यांचे नाव आहे. परंतु अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठापणेच्या निमित्ताने मुंबईच्या मीरा-भाईंदर भागात घडलेल्या राड्याचा राजकीय लाभ उचलण्याच्या दृष्टीने इम्तियाज जलील व त्यांच्या एमआयएम पक्षाने मुंबईतून लोकसभा लढवता येते का? याची चाचपणी केली होती.
प्रसारमाध्यमांमध्येही याची मोठी चर्चा ओवेसी-इम्तियाज यांनी घडवून आणली होती. मात्र, ही अफवा असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. इम्तियाज जलील मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी खुद्द इम्तियाज जलील यांनी दिली होती.